Pimpri: आयुक्त हर्डीकर यांना उत्तर प्रदेशात इलेक्‍शन ड्युटी; पदभार अतिरिक्त आयुक्तांकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लोकसभा निवडणुकीची ड्युटी लागल्याने आयुक्तपदाचा पदभार आज (सोमवार) पासून अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी आयुक्तांशी चर्चा करावी लागणार आहे. या फेरबदलाचा आदेश जारी करण्यात आला आहे. 
लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांची सेवा करत असलेल्या राज्याबाहेर निरीक्षकपदी  नियुक्‍ती करण्यात येते. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उत्तरप्रदेशात निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली असून ते उत्तरप्रदेशला गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत प्रशासकीय कामकाजाच्या आवश्यकतेनुसार आयुक्तपदाची जबाबदारी अन्य अधिका-यांकडे सोपविणे आवश्‍यक होते.

  • त्यानुसार  कामकाजाचा खोळंबा होऊ नये, म्हणून अतिरिक्त आयुक्त (1) संतोष पाटील यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. आगामी वीस ते पंचवीस दिवस हा बदल राहणार आहे. या कालावधीत सर्व विषयांबाबत प्राप्त होणारी कागदपत्रे व नस्त्यांपैकी तातडीच्या व महत्वाच्या नस्त्यांवर महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्त संतोष पाटील यांनी आयुक्तांशी चर्चा करुन ‘आयुक्तांकरिता’ म्हणून स्वाक्षरी करावी.
या कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त पाटील यांना आयुक्त हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागणार आहे. या कालावधीत घेतलेले निर्णय आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयुक्तांना अवलोकनार्थ सादर करावा लागणार आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.