Pimpri : मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला

एमपीसी न्यूज – मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी होळकर ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला. ही घटना आज (सोमवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवली.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीकडून पिंपरीच्या दिशेने जात असलेला कंटेनर मोरवाडी येथे अहिल्यादेवी होळकर ग्रेड सेपरेटरमध्ये अडकला. कंटेनरची उंची जास्त असल्याने कंटेनर अडकला. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

  • दरम्यान, कंटेनरच्या मागे वाहनांच्या काही अंतरावर रांगा लागल्या. तसेच सर्व्हिस रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद आहे. ग्रेड सेपरेटरमधील वाहने सर्व्हिस रस्त्यावरून जात असल्याने एका रस्त्यावर वाहतूककोंडी झाली.

वाहतूक पोलिसांनी निगडी-पिंपरी या मार्गावरील ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक कीज् हॉटेल समोरून सर्विस रस्त्यावर वळवली. तसेच कंटेनर काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे निगडीकडून पिंपरीकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर मोरवाडी येथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पिंपरी वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.