Pimpri Crime News : सुमारे 10 कोटींचे बोगस कर्जवाटप प्रकरणी सेवा विकास बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह 27 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दि सेवा विकास बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ आणि अधिका-यांनी मिळून दहा कोटी 37 लाख 30 हजार रुपये रकमेची बोगस कर्जे वाटप केली. याबाबत बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सन 2016 ते 31 मार्च 2019 या कालावधीत दि सेवा विकास को ऑप बँक मुख्य शाखा, पिंपरी येथे घडला.

तत्कालीन चेअरमन अमर साधुराम मूलचंदानी, संचालक मनोहर साधुराम मूलचंदानी, डॉ. गुरुबक्ष मतनानी, विजयकुमार गोपीचंद रामचंदानी, नरेंद्र पांडुरंग ब्राह्मणकर, पंकज प्रकाश मसंद, धीरज साधू भोजवानी, शिवदास प्रकाश पमनानी, भारती प्रकाश नंद, दया अशोक मूलचंदानी, दीपा जीवत मंगतानी, राजेश पोपट सावंत, चंद्रशेखर अहिरराव, अशोक साधुराम मूलचंदानी, मुख्य कार्यकारी अधिकारी टी. एन. लखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. बासी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच टी मुलानी (मयत), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा, सहमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. हिंदुजा, सहाय्यक व्यवस्थापक तथा कर्ज विभाग प्रमुख विजय चांदवानी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भगवानी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी सीमा सूर्यवंशी, उपव्यवस्थापक तथा कर्ज विभाग प्रमुख विजय चांदवानी, कर्जदार मे. रिद्धी सिद्धी इंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रायटर धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर, नेत्रा धर्मेंद्र सोनकर, सोनकर इन्फ्रा अँड सिव्हिल इंजिनिअरिंग तर्फे प्रोप्रायटर शैलेंद्र ब्रिजलाल सोनकर, प्राईम कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर रतन ब्रिजलाल सोनकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) राजेश उद्धवराव जाधवर (वय 50) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत, पूर्वनियोजित कटकारस्थान रचून कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता न पाहता, अपुरे तारण असताना मालमत्तेचे मूल्यांकन कमी असताना, तारण मालमत्ता विक्रीयोग्य व निर्वेध नसताना कर्ज रक्कम वितरित केली.

कर्जदाराने वितरित कर्ज रकमेचे वक्रवहन व गैरविनियोग केल्याने तसेच पूर्वीची थकीत कर्ज खाती नियमित व परतफेड करण्यासाठी कर्जनिधीचा वापर केल्याने बँकेने कर्जदाराला विशेष अनुकूलता ठेऊन कर्ज मंजूर केले. यामुळे सोनकर समूहाची अनुत्पादक कर्जे वाढण्यावर परिणाम झाला.

बँकेचे लेखापरीक्षण झाल्यानंतर त्यामध्ये 10 कोटी 37 लाख 30 हजार रुपये एवढी रक्कम अनुत्पादित होऊन सोनकर समूहातील अयोग्य कर्जदारांकडे असुरक्षितरित्या अडकून पडली आहे.

फिर्यादी यांनी केलेल्या लेखापरीक्षणात बँकेने 790 लाख रुपयांची बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने, कर्जदाराची ऐपत नसताना कर्जे मंजूर केल्याचे आढळले आहे. आरोपींनी वरील कालावधीत 10 कोटी 37 लाख 30 हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार, निधीचा दूरविनियोग, अफरातफर केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 406, 408, 409, 420, 467, 468, 471, 109, 120 (ब), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.