Pimpri : चोरीच्या कारमधून प्रवासी वाहतूक करणा-या सराईताला अटक

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

एमपीसी न्यूज – घरफोडीचे साहित्य चोरीच्या कारमध्ये घेऊन फिरणा-या एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे- मुंबई महामार्गावर उर्से टोलनाका येथे केली. आरोपी पुणे-मुंबई या मार्गावर चोरीच्या कारमधून प्रवासी वाहतूक करीत होता.

मुरली जिनप्पा पुजारी (वय 36, रा. मिला बेल हाऊस, ता. मंगलुर, दक्षिण कन्नड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी सचिन उगले यांना किवळे येथून द्रुतगती मार्गावर एक संशयित इनोव्हा कार (एमएच 12 एके 5364 ) जाताना दिसली. त्यानुसार उर्से टोलनाक्‍यावर पोलिसांनी ती कार थांबवून चालकाची चौकशी केली. त्या कारमध्ये घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच, ती देखील चोरीची असल्याचे निदर्शनास आले. कार बाबत पालघर येथील कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कारच्या मूळ चालकाला धाक दाखवून कार पळवून आणली असल्याचे त्याने सांगितले. तसेच, त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता, सहकारनगर पोलीस ठाण्यातील दोन सुमो व चार दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत. आरोपीवर यापूर्वी खोपोली येथे दरोडयाचा गुन्हा आहे. तर, नाशिक येथे सोनाच्या दुकानावर दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हा आहे. खोपोली पोलिसांनी आरोपीवर मोक्काची कारवाई देखील केली आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नवी मुंबई येथून मोकाच्या खटल्यातून त्याला जामीनावर नुकतेच सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याने ही इनोव्हा कार चोरली व त्याने वाकड येथून पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली होती. महिनाभरापासून तो हा व्यवसाय करत होता. मात्र घरफोडीसाठी त्याने नुकतेच छन्नी, लोखंडी वायर, मास्क असे साहित्य देखील खरेदी केले होते. मात्र पोलिसांनी त्या आधीच त्याचा डाव उधळला. पुजारी याला ताब्यात घेतले त्यावेळी देखील त्याच्या गाडीत तीन प्रवासी होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, अमित गायकवाड, प्रमोद लांड, पोलीस कर्मचारी सचीन उगले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.