Pimpri: ‘तो’ निर्णय मागे घ्या; अन्यथा जनहित याचिका दाखल करु’

संतोष सौदणकर यांचा महावितरणाला इशारा

एमपीसी न्यूज – वीज बिलाचा धनादेश बाउन्स झाल्यास अतिरिक्त दंड आकारून ग्राहकांच्या लुटमारीचा डाव महावितरणने आखला आहे. हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महावितरणच्या विरोधात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.

याबाबत राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात सौदणकर यांनी म्हटले आहे की, महावितरणच्या चेक बाउन्ससाठी 1500 रुपये ग्राहकांकडून वसूल करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. 99 टक्‍के धनादेश हे ग्राहकांच्या खात्यांमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असताना देखील ग्राहकांच्या अक्षरी किंवा अंकी रक्कम लिहिताना अथवा किरकोळ तांत्रिक कारणामुळे चेक बाउन्स होऊ शकतो. मात्र 1 टक्‍के पेक्षा कमी ग्राहक मुद्दामहून वेळ निभावून नेण्यासाठी धनादेश देत असतात.

या एक टक्‍के ग्राहकांचा त्रास इतर 99 टक्‍के ग्राहकांना का, असा सवाल त्यांनी केला आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा महावितरणच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.