Pimpri: भयभीत होऊ नका; ‘सतर्क’ रहा अन् कोरोनाशी मुकाबला करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसला भयभीत न होता, सतर्क राहून आपल्या सर्वांना या संकटाचा मुकाबला करायचा आहे. कोरोनाबाबत योग्य काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष  आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना केले आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने दहशत माजविली असताना हा व्हायरस भारतात दाखल झाला आहे. कोरोनाने महाराष्ट्रातील पुण्यातही शिरकाव केला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर सात खासगी रूग्णालयात 48 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रसार ‘ड्रॉप’ लेन च्या माध्यमातून होतो. त्यासाठी वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वैद्यकीय सल्ल्यानुसार मास्कचा वापर करावा असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसबाबत नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यासाठी चौकांमध्ये फलक लावण्यात आले आहेत. डॉक्‍टरांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांना सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. करोना रुग्णांसाठी वायसीएममध्ये स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. त्यामुळे  रुग्ण आल्यास त्याला दाखल करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु कऱण्याची तत्काळ व्यवस्था केली आहे.

कोरोनाची लक्षणे-  डोकेदुखी, नाक वाहणे/ सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थता, दम्याचा त्रास आणि थकवा जाणवतो.

खबरदारीचे उपाय – कोरोना व्हायरस हा हवेद्वारे, शिंकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. त्यामुळे आपले हात बाहेरून आल्यावर सातत्याने धुणे, शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रूमाल धरणे, आपल्या बोटांनी डोळे,नाक आणि तोंडाला स्पर्श न करणे, अर्धवट शिजलेले कच्च मांस खाणे टाळावे, प्राण्यांपासून दूर राहणे, श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे टाळणे आवश्यक आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.