Pimpri: महापालिकेचे येस बँकेत अडकलेले 984 कोटी रुपये काढण्यासाठी प्रयत्न करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज –  खासगी क्षेत्रातील येस बँकवर आरबीआयने निर्बंध घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये अडकले आहेत. आता ते कसे मिळतील. किती मिळतील. त्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे राज्याचे अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच सरकारी पैसा राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवण्यात यावा. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.6) तळेगावदाभाडे येथे आले होते. त्यावेळी पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे करदात्यांचे दैनंदिन गोळा झालेले तब्बल  984 कोटी रुपये येस बँकेत अडकले असल्याचे अजितदादांना सांगितले.

त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, येस बँकेबाबत बरेच काही ऐकायला मिळत आहे. आत्ताच नाना काटे, संजोग वाघेरे यांनी पिंपरी महापालिकेचे बँकेत पैसे अडकल्याचे सांगितले. येस बँकेत भरलेले पिंपरी महापालिकेचे तब्बल 984 कोटी रुपये अडकले आहेत. आता ते कसे मिळतील. किती मिळतील. त्यासाठी प्रयत्न केला जाईल.

पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वांना सांगितले आहे. राज्य सरकारचा, महामंडळाचा कोणताही निधी राष्ट्रीयकृत बँकाशिवाय दुसरीकडे ठेवता कामा नये. अन्यथा मी कारवाई करेल, असा इशारा दिला आहे. कारण, खासगी बँका बंद पडत आहेत. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक,  रुपी बँक, रायगडमधील कर्नाळा बँक  अडचणीत आली आहे. पंजाब महाराष्ट्र बँक देखील अडचणीत आली आहे. अशा प्रकारे बँका अडचणीत येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.