Pimpri : बैलगाडा शर्यतीबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

एमपीसी न्यूज- मागील आठ वर्षापासुन बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करणा-या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली असून बैलगाडा शर्यतीच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता उद्या, मंगळवारी होणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा शर्यंत संघटनेचे संदीप बोदगे यांनी दिली आहे.

राज्य सरकारने मागील वर्षी बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केलेला असला तरी मुंबईचे अजय मराठे यांनी या कायद्यास मुंबई उच्च न्यायलायात आव्हान दिले आहे. त्यामुळे कायदा होऊन सुध्दा अद्याप शर्यतीस परवानगी मिळू शकलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केलेले असून हे प्रकरण आता पाच न्यायाधीश असलेल्या खंडपीठाकडे वर्ग झाले आहे.

जवळपास एक वर्षापासून या प्रकरणामध्ये कोणतीच सुनावणी झालेली नसून अद्याप शर्यतींना परवानगी मिळाली नसल्याने राज्यातील शेतकरी नाराज आहेत. विशेष म्हणजे तमिळनाडु व कर्नाटक या राज्यांनी सुध्दा बैलगाडा शर्यतीबाबत कायदे केलेले असून सर्वोच्य न्यायालयाने या राज्यांच्या कायद्यास अद्याप स्थगिती दिलेली नाही. म्हणुन एकाच देशात दोन राज्यात शर्यती चालु तर दुसरीकडे बंद अशी विरोधाभास असलेली स्थिती निर्माण झालेली आहे.

यामुळे मागील आठ वर्षापासून बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करणा-या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. बैलगाडा शर्यतीचे प्रलंबित असलेल्या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घ्यावी अथवा तमिळनाडु व कर्नाटक राज्याप्रमाणेच महाराष्ट्राला सुध्दा घटनापीठाचा अंतिम निकाल होईपर्यंत तात्पुरती परवानगी द्यावी अशी विनंती नवीन याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. सर्वोच्य न्यायालयात याप्रकरणाची उद्या, मंगळवारी सरन्यायाधीश रंजन गोगई व न्यायमुर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर सुनावणी होणार असून याबाबत न्यायालय काय आदेश देतेय याकडे राज्यातील बैलगाडा शर्यत मालक शेतक-याचे लक्ष लागले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.