Pimpri : पिंपरी-चिंचवड तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ नेरकर यांची निवड

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ विठ्ठल नेरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे येथे नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या सभेत ही निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संघाचे कार्यवाह सोपानराव पवार यांनी त्यांना दिले. पिंपरी-चिंचवड, देहूरोड, मावळ व हवेली हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे.

शासनमान्य ग्रंथालयाच्या समस्या, अनुदानात तिपटीने वाढ, नवीन ग्रंथालयांना शासनमान्यता, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी या प्रश्नावर तसेच शासनमान्य ग्रंथालयांना नगरपालिकेकडून दरवर्षी एक लाख रुपये अनुदान मिळावे, शासनमान्य ग्रंथालयांना प्रशस्त कायमस्वरूपी जागा नाममात्र दरात मिळाव्यात यासाठीसुद्धा शासनाकडे व महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे नेरकर यांनी सांगितले

डिजिटल व मोबाईल युगाचे आक्रमणझाल्यामुळे रोडावलेला वाचकवर्ग ग्रंथालयाकडे कसा वळेल त्यासाठी प्रकाशक-लेखक सर्व स्तरातील वाचक यांच्याशी संवाद साधून वाचक वर्ग वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नेरकर हे सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष असून 1990 पासून चळवळीत कार्यरत आहेत तसेच त्यांचे ‘आम्ही घडलो वाचनाने’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.