Pimpri: महामेट्रोने परप्रांतीयांऐवजी राज्यातील भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे – सचिन चिखले

Mahametro should give priority to Bhumiputras in the out state workers - Sachin Chikhale :कामगारांअभावी मेट्रोचे काम मंदावले

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनमुळे मेट्रो प्रकल्पावर काम करणारे परराज्यातील कामगार आणि कर्मचारी काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी गेले आहेत. यामुळे इथल्या उद्योगांबरोबरच महामेट्रोसमोर एक नवं संकट उभं राहिले आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबधित कंत्राटदाराकडून परप्रांतातीय कामगारांना पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याऐवजी त्यांनी राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष व पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

याबाबत चिखले यांनी महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील लाखो मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत.

880 कामगारांच्या सहाय्याने पुणे आणि पिपरी चिंचवड परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु होते. कामगार गावी गेल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता असल्याने तूर्तास कामाला गती नाही.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मेट्रोचे काम वेगात सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परप्रांतिय कामगार गावी परतल्यामुळे त्याला खो बसला आहे. त्यामुळे महामेट्रोच्या निगडी ते स्वारगेट या मार्गाच्या कामांचा वेग मंदावला आहे.

मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबधित कंत्राटदाराकडून मनुष्यबळाची जमवाजमव सुरु करण्याचे काम सुरु असल्याचे समजते. पाटणा, झारखंड व रायपूरमधील कामगार परत आणण्यासाठी मेट्रोच्या कंत्राटदाराने बसेस पाठवल्या आहेत.

जर हे कामगार स्वखुशीने आप-आपल्या गावी परत गेले असतील तर त्यांना परत आणण्याऐवजी आपल्या मराठी माणसांना कंत्राटदाराने संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे भूमीपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे चिखले यांनी या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.