Kailash Kher : आत्मनिर्भर हम, बोलो वंदे मातरम…

'Atmanirbhar hum, bolo vande mataram'

एमपीसी न्यूज – चीनने गलवान प्रांतात भारतीय हद्दीत आक्रमण केल्यानंतर चिनी वस्तू बॅन करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर बनो अशी देशवासियांना हाक दिली. त्याचदरम्यान करोनाच्या साथीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन होता. एकीकडे करोनाची भीती तर दुसरीकडे चीनची आगळीक या परिस्थितीत नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी म्हणून अनेक सेलिब्रेटी पुढे आले. त्यांनी लोकांना विविध प्रकारे आवाहन केले.

अशीच एक साद ‘हम से बेहतर हम बोलो वंदे मातरम, आत्मनिर्भर हम बोलो वंदे मातरम’ या बोलांसह कैलाश खेर यांनी खड्या आवाजात घातली. कैलाश यांनी हिंदी, मराठी व इतर भाषांमध्ये हे गीत गायले आहे. तसेच दक्षिणी भाषांमध्ये हेच गीत शंकर महादेवन यांनी गायले आहे. या दोघांचे हे  प्रेरणादायी बोल ऐकल्यावर आपल्याला नक्कीच भारावून जायला होईल. सध्या विविध भाषांमधून कैलाश खेर यांनी गायलेला हा व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनेल्सवर प्रसारित होत आहे. करोना आणि चीनने उगाचच काढलेली आगळीक यांच्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रेरणादायक असे काहीतरी हवेच आहे.

यामध्ये भारताची उज्ज्वल परंपरा, इतिहास, संरक्षण क्षेत्रातील कामगिरी यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच सायन्स, तंत्रज्ञान, आरोग्य, संरक्षण क्षेत्रातील विविध गोष्टी ज्या भारताने जगाला दिल्या यांचा या गाण्यात कौशल्याने उल्लेख केला आहे. भारताने शून्याचा शोध लावला, तक्षशीला विद्यापीठ, वसुधैव कुटुंबकम् ही घोषणा, तेजस हे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान , योगविद्या, सुश्रुताचे शल्यतंत्र, संशोधक जगदीशचंद्र बोस, सी. व्ही. रामन,  अजय भट्ट, हरगोविंद खुराना, पेंटियम शोधणारे विनोद धाम, जगातील आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल,  स्वदेशी, चांद्रयान, बाघा बॉर्डर, मेक इन इंडिया या सर्वांचा उल्लेख या व्हिडिओत आहे.  या सगळ्या गोष्टींचा या गाण्यात खुबीने वापर करण्यात आला आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला निळ्या आकाशात डौलाने विहरणारा तिरंगा आणि त्यानंतर सुसज्ज भारतीय संरक्षणदल पाहून आपल्याला नक्कीच गर्व वाटेल.  मॅनकाइंड फार्माने तयार केलेल्या या व्हिडिओतील गीताचे लेखन कैलाश खेर यांनीच केले आहे. तसेच त्याला संगीत देखील त्यांनीच दिले आहे.

आत्मनिर्भर भारताची झलक दाखवणारा हा व्हिडिओ सर्वांनीच अवश्य पाहायलाच हवा असा आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.