Pune : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करा : जिल्हाधिकारी

Find and check the person in contact with coronavirus patients: Collector ;पुणे, देहू आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सूचना

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.

पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळाच्या (कॅन्टोन्मेंट ) वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंग, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी आदींसह देहू आणि खडकी कटक मंडळाचे (कॅन्टोन्मेंट ) वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणत वाढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा.

कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढवाव्यात. रुग्णांवर उपचार करताना दर आकारणी शासकीय नियमानुसार करावी. तसेच रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा.

त्यांना वैद्यकीय सुविधा वेळोवेळी पुरविण्यात याव्यात. कोरोना रुग्णांबाबतचा अहवाल अद्ययावत करुन वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

क्वॉरन्टाईन केलेल्यांना क्वॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात यावा. तसेच रुग्णालयांना मनुष्यबळ व इतर अडचणी असल्यास त्याबाबतची माहिती ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. ही माहिती सुसंगत असावी. त्यास प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

दरम्यान , देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत कोविड केअर सेन्टर सुरु करण्यात आले आहे. मात्र, या केंद्रासाठी आवश्यक वैद्यकीय डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी बैठकीत सांगितले.

त्याचरोबर पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आपापल्या हद्दीतील प्रश्न मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.