Pimpri : इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे युती-आघाडीत बंडखोरी अटळ

तीन जागांसाठी 48 जण इच्छुक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही बंडखोरी अटळ दिसत आहे. या तीनही मतदारसंघातून तब्बल 48 उमेदवार शड्डू ठोकून तयार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे दोन लाख मताच्या फरकाने सलग दुस-यावेळी निवडून आले आहेत. त्यामुळे युतीच्या इच्छुकांमध्ये उत्साह आहे. तर, शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक ‘आशावादी’ आहेत. चारही प्रमुख पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी तब्बल 48 जण इच्छुक आहेत. त्यामुळे बंडखोरी अटळ दिसत आहे.

2014 ची विधानसभा निवडणूक चारही राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढविली होती. पिंपरीतून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार, चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून महेश लांडगे अपक्ष निवडून आले. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुफडासाफ झाला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत काही होईल हे सांगता येत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक सचिन भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, युवराज दाखले असे चार जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून माजी आमदार आण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, संदीपान झोंबाडे, सुनंदा काटे, गंगा धेंडे, काळूराम पवार असे नऊ जण इच्छुक आहेत. तर, भाजपचे राजेश पिल्ले, अमित गोरखे, नगरसेवक शैलेश मोरे, वेणू साबळे, तेजस्विनी कदम, भीमा बोबडे, दीपक रोकडे असे सात जण इच्छुक आहेत. आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या देखील इच्छुक आहेत. पिंपरीतून 21 उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे पिंपरीमध्ये चारही पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सचिन चिंचवडे, पिंपरीगावचे नगरसेवक संदीप वाघेरे, शिवसेनेकडून महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे इच्छुक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, सतीश दरेकर, राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर असे आठजण इच्छुक आहेत. चिंचवड मतदारसंघातून एकूण 14 जण इच्छुक आहेत.

भोसरीतून भाजप संलग्न आमदार महेश लांडगे, भाजयुमोचे शहराध्यक्ष रवी लांडगे, सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी मुलाखती दिल्या आहेत. महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार महाजनादेश यात्रेत असल्याने मुलाखत देऊ शकले नाहीत. परंतु, आपण इच्छुक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.  शिवसेनेकडून भारतीय कामगार संघटनेचे उपाध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद, शिरुरच्या संघटिका सुलभा उबाळे, शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे हे तयारीत आहेत. राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे, दत्ता साने, अजित गव्हाणे, जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, पंडीत गवळी इच्छुक आहेत. भोसरी मतदारसंघातून 13 जण इच्छुक आहेत.

शहरातील तीन जागांसाठी 48 जण इच्छुक आहेत. यंदा वंचित बहूजन आघाडीचे देखील उमेदवार असणार आहेत. यामुळे युती आणि आघाडीत बंडखोरी अटळ दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.