Pimpri: उपमहापौर झाले महापौर; नगरसेवकांकडून अभिनंदनाचा वर्षाव अन् महासभा तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांच्या गैरहजेरीत उपमहापौर सचिन चिंचवडे यांना महासभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे चिंचवडे यांना काही तासापुरते महापौरांच्या जागी बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची उपमहापौरांचे अभिनंदन केले.

जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन्ही तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित केल्या होत्या. उपमहापौर सचिन चिंचवडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. माजी अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुलाल गौर यांना श्रद्धांजली वाहून या दोन्ही महासभा शनिवार (दि. 7) दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत. भाजपचे नामदेव ढाके यांनी सभा तहकुबीची सूचना मांडली. त्याला माऊली थोरात यांनी अनुमोदन दिले.

उपमहापौर सचिन चिंचवडे यांना सभेच्या अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाल्याने नगरसेवकांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, उपमहापौर चिंचवडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची तयारी करत आहेत. निवडणुकीची तयारी करत असतानाच त्यांना महापौर म्हणून बसायला मिळाले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात आजपर्यंत सगळ्या आडनावाचे महापौर झाले. परंतु, चिंचवडे आडनावाचा महापौर झाला नव्हता. आज सचिन चिंचवडे यांच्या रुपाने चिंचवडे नावाचा महापौर झाला आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो.

उपमहापौर चिंचवडे यांना सभेच्या अध्यक्षस्थानी बसलेले पाहून आनंद झाला. त्यांचे मी अभिनंदन करते, असे भाजपच्या माई ढोरे म्हणाल्या.
माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, उपमहापौर चिंचवडे यांच्या हाती आज सभेची सूत्रे आहेत. त्यांनी सभा कामकाज चालवावे. केवळ मागे बसल्यानंतरच उपमहापौर पाणी-पाणी करतात. आज त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल आहे. त्यांनी महासभेचे कामकाज चालवावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.