Pimpri News : ‘पत्रकार व पोलिसांसाठी राखीव बेड व कुटुंबियांना 50 लाखांचे सुरक्षा कवच द्या’

संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांना दिले निवेदन

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस आणि पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यावर वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यातून काही कोरोना योद्धयांचे मृत्यू देखील झालेले आहेत. त्यामुळे या कोरोना योद्धयांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात यावेत व त्यांना मोफत उपचार तसेच विना विलंब सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांचे सुरक्षा कवच देण्यात यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांना दिले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा वैद्यकीय सेवेवर ताण पडताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. बऱ्याच ठिकाणी सरकारने जम्बो कोविड सेंटर उभी केली आहेत, पण ती खाजगी तत्वावर सुरु आहेत.

सरकारचे त्यावर नियंत्रण दिसून येत नाही आणि त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झालेले आहेतच पण लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकार मित्रांचा बळी या व्यवस्थेने घेतला असल्याची अशी चर्चा जनतेत सुरु आहे.

पुण्यामधील पत्रकार पांडुरंग रायकर तसेच कर्जत येथील संतोष पवार यांच्या सारखे तरुण पत्रकार या सरकारी व्यवस्थेचा बळी ठरलेले काही दिवसांपूर्वी पाहिले आहे. रायकर यांना वेळीच ऑक्सिजन बेड ना मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला.

तर पवार यांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. याला जबाबदार कोण ?. त्यांचा मृत्यू हा उपचारावेळी झालेला नसून उपचार करण्यासाठी बेडच मिळालेला नाही, किंवा तत्काळ ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून झालेला आहे.

पत्रकारांची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होत असेल याची कल्पना सुद्धा आपण करु शकत नाही. पत्रकार हे आपल्या जीवावर आणीबाणीच्या परिस्थितीत एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील प्रत्येक खबरबात जगासमोर घेऊन येत आहेत.

या मध्ये त्याचं काम हे समाजासाठी एक आदर्श असते. परंतू, तेच पत्रकार शासकीय निष्क्रियेतेचा बळी ठरत असेल तर ते आपल्या महाराष्ट्राला शोभणारं नाही.

पत्रकार कोरोना महामारीत देखील आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तसेच सरकार व प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस प्रशासन तसेच शासकीय कर्मचारी हे देखील स्व:ताचा जीव धोक्यात घालून आपले काम करत आहेत.

या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रकास जाधव, जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्वर लोभे, गणेश सरकटे, कृष्णा मोरे यांच्या सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.