Pimpri News: भाजपने बदलला आपलाच ठराव, पुन्हा ‘स्मृतीचिन्हे’ खरेदी करणार

एमपीसी न्यूज – स्मृतीचिन्हांवर खूप मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत असल्याचे सांगत 16 मे 2018 मध्ये स्मृतीचिन्ह देण्याच्या बंद केलेल्या आपल्याच ठरावात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दुरुस्ती केली. विशेष उल्लेखनीय व्यक्तींकरीता आवश्यकतेनुसार स्मृतीचिन्हे भांडार विभागामार्फत खरेदी करण्याचा सदस्यपारित ठराव आज (बुधवारी) मंजूर केला. त्यासाठी किती खर्च येणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2017 मध्ये सत्तेत येताच भाजपने उधळपट्टीला चाप लावणार, ना खाऊंगा ना खाने दुंगा असा नारा दिला. काटकसर, बचतीचे कारण देत महापालिकेकडून छापली जाणारी दैनंदिनी बंद केली. स्मृतीचिन्हे देणे बंद केले. महापालिकेच्या वतीने जनसंपर्क विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभागासह महापालिकेचे होणारे विविध कार्यक्रम, भूमिपूजन, उद्घाटन इत्यादी असे विविध कार्यक्रमांसाठी फोर कलरमध्ये निमंत्रण पत्रिका छापले जातात. तसेच स्मृतिचीन्ह दिले जाते. तरी, याचा खूप मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होते असे निदर्शनास आले आहे. यापुढे फोर कलरमध्ये निमंत्रण पत्रिका कायमस्वरुपी छापणे बंद करावे. कॉम्प्युटरद्वारे निमंत्रण पत्रिका बनवून त्याची झेरॉक्स प्रति वाटावी, स्मृतीचिन्ह देण्याचे बंद करण्याचा ठराव (क्रमांक 2673) 16 मे 2018 मध्ये पारित केला होता. भाजपच्या ममता गायकवाड स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या.

महापालिकेची आगामी निवडणूक सहा महिन्यांवर येवून ठेपली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपणच केलेल्या ठरावाला तिलांजली दिली. 2018 मध्ये केलेल्या ठरावात आजच्या स्थायी समिती सभेत दुरुस्ती केली. महापालिका क्षेत्रात अनेक नामवंत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवर, खेळाडू, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते वास्तव्य करतात. त्यामुळे स्थायी समितीने पारीत केलेल्या ठरावात दुरुस्ती करुन विशेष उल्लेखनीय व्यक्तींकरीता आणि महापालिका आवश्यकतेनुसार स्मृतीचिन्हे भांडार विभागामार्फत खरेदी करण्यास आणि त्याकामी येणाऱ्या खर्चास सदस्यपारित प्रस्तावाद्वारे मान्यता दिली. परंतु, त्यासाठी नेमका किती खर्च येणार आहे. याचा ठरावात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.