Pimpri News: ‘ईडी’ची भीती अन् पदांची आमिषे दाखवून भाजप वाढला’

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी पृथ्वीराज साठे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले पिंपळेनिळख येथील रहिवाशी पृथ्वीराज साठे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये विधानसभेची निवडणूक असलेल्या आसाम राज्याच्या सहप्रभारी पदाची धुरा त्यांच्याकडे सोपविली आहे. ‘राजकीय नेत्यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ची भीती अन् पदांची आमिषे दाखवून भाजप पक्ष वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

पिंपरीत साठे यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अख्तार चौधरी, बाळासाहेब साठे यावेळी उपस्थित होते.

साठे म्हणाले, काँग्रेसने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय कार्यकरणीत सचिव पद देवून देश पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. आसाम राज्याचे सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. आगामी काळात काँग्रेसचे संघटन वाढविण्यावर भर देणार आहे.

पक्षाचे विचार हे अधिक खोलवर पसरवून कार्यकर्त्यांच्या नेटवर्किंग मधून पक्षाची ताकद वाढविणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा पक्ष मजबुतीने बांधला जाईल. शहरात काँग्रेस नक्कीच उभारी घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहरातील कार्यकर्त्याला देशपातळीवर काम करण्याची संधी !

पृथ्वीराज साठे हे पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलखचे रहिवाशी असून ते शहराचे माजी महापौर प्रभाकर साठे यांचे चिरंजीव आहेत. साठे यांना संघटनात्मक राजकारणाचा चांगला अनुभव आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेस संघटनेमध्ये सक्रीय असून विविध पदावर विविध राज्यातून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध स्तरावर त्यांनी काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.