Pimpri News: ‘आऊटसोसिंगद्वारे’ कर्मचारी नेमणुकीचा निर्णय रद्द करा- भापकर  

एमपीसी न्यूज – ठेकेदारांना पोसण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयासाठी आऊटसोसिंगद्वारे कर्मचारी नेमण्याचा विषय मंजूर केल्याचा आरोप करत रुग्णालये खासगीकरण करण्याचा जनहित विरोधी निर्णय रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिका-यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचा-यांची आऊटसोसिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे.

या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात असलेले बी. जे. मेडीकल कॉलेज, मुंबईतील के. एम. रुग्णालय आणि राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारची आणि महापालिकेची रुग्णालये विनाखासगीकरण सुरु आहेत. मग, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे रुग्णालयामध्ये खासगी कर्मचारी भरण्याचा घाट कशासाठी? हा निर्णय संबधित ठेकेदारांना पोसण्यासाठी असून यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे की काय? असा संशय निर्माण होत आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणारे डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ यांची नियुक्ती होत असताना त्यांच्या गुणवत्तेबाबत कायम संशय असणार आहे.

कोविड महामारीच्या काळात जम्बो रुग्णालय व ऑटो क्लस्टर रुग्णालयाच्या कामकाजाची अनुभूती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी व शहरवासीयांनी नुकतीच घेतली आहे. रुबी अलकेअर रुग्णालयाचे अनुभवही चांगले नाहीत. त्यामुळे हा आपला निर्णय शहरातील गोरगरीब रुग्णांच्या जिवीताशी खेळण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.

वैद्यकीय विभागातील डॉक्टर्ससह इतर आवश्यक कर्मचारी ठेकेदार पध्दतीने भरणे म्हणजे या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. या खासगीकरणातून कंत्राटदार, प्रशासन व राजकीय नेते यांचे आर्थिक हितसंबध तयार होतील. त्यातून कर्मचाऱ्यांचे शोषण होईल.

या निर्णयातून महापालिका कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाकारत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीप्रमाणे कोणताही लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी भापकर यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.