Pimpri News : वुमन्स हेल्पलाईनच्या प्रयत्नामुळे अल्पवयीन मुलीचा विवाह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा कोल्हापूर जिल्ह्यातील मुलासोबत विवाह लावण्यात आला. याबाबत वुमन्स हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे विवाह लावणाऱ्यांवर आणि पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयसिंगपूर येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाला असल्याचे वुमन्स हेल्पलाईनच्या सदस्यांना समजले. त्यानंतर सदस्यांनी संबंधित पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांना देखील माहिती देण्यात आली. त्यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना सांगून सूत्रे हलवली.

सुरुवातीला वयाचा पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यात केला नाही. मात्र, वुमन्स हेल्पलाईनच्या सदस्यांनी मुलीच्या वयाचे पुरावे गोळा करून पोलिसांसमोर सादर केले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

सर्वांच्या प्रयत्नांमुळे 15 वर्षीय मुलीचा 19 वर्षीय मुलासोबत लावलेला विवाह मोडून मुलीची सुटका करण्यात आली. तसेच पती आणि त्याच्या सात नातेवाईकांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत वुमन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी, उज्वला बोभाटे, दीपा कुलकर्णी, सोनाली साठे, ॲड. सारिका परदेशी यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.