Pimpri news: पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील भैरवनाथ मंदिर जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ पुतळा बसविण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामाला जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्फत मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, पिंपरी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ पुतळा व्हावा ही सर्व ग्रामस्थ, शिवप्रेमी व तरुण वर्गाची अनेक वर्षापासूनची इच्छा होती.

तत्कालीन नगरसेविका सुनीता वाघेरे यांनी याबाबतचा प्रस्ताव सन 2012 साली महापालिकेस दिलेला होता. परंतु, हा विषय प्रशासनाच्या गलथानपणामुळे गेली कित्येक वर्ष रखडला होता. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीनंतर हा रखडलेला विषय हाती घेण्यात आला.

याबाबत शिल्पकार संजय कुंभार यांची सातारा येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन क्ले मॉडेलची पाहणी करून कामाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर कलासंचनालय मुंबई तसेच मुख्य वास्तुशास्त्रज्ञ मुंबई, पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्याशी संपर्क साधून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

या सर्व विभागांची परवानगी मिळालेनंतर जिल्हास्तरीय पुतळा समितिचे अध्यक्ष राजेश देशमुख यांच्याकडे प्रस्ताव मंजूरीसाठी देण्यात आला होता.

22 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी व महापालिका अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत याविषयी सकारात्मक चर्चा होऊन आज राजेश देशमुख यांनी शासकीय अटी व शर्थींच्या अधीन राहून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्थ पुतळा बसविण्याच्या कामास मंजूरी दिली आहे.

या मंजूरीमुळे पिंपरीगाव व परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शिवप्रेमी, तसेच तरुण मंडळी व जेष्ठ नागरिकांनी वाघेरे यांचे आभार मानले.

असे असेल पुतळ्याचे स्वरूप

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्थ पुतळा जी किल्ले रायगडची प्रतिकृती असेल.

पुतळ्यासाठी उंच आकर्षक चबुतरा बांधण्यात येणार आहे.

ब्रांझ धातुपासून पुतळा बनविण्यात येणार आहे.

पुतळ्याचे अंदाजे वजन 1200 किलोपर्यंत असणार.

पुतळ्याची ऊंची साधारणत: 8 फुट उंच तर रुंदी अंदाजे 5 फुट 5 इंच असेल.

पुतळ्यासाठी आकर्षक मेघडंबरी करण्यात येणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.