Pimpri News: भाजपच्या काळात अधिकपटीने भ्रष्टाचार, महापालिका बरखास्त करा – मानव कांबळे

एमपीसी न्यूज – ‘ना भय, ना भ्रष्टाचार’, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशा पद्धतीच्या वल्गना सत्ताधारी भाजपने केल्या. परंतु, मागच्या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नाही. त्याच्या कितीतरी अधिकपटीने भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात महापालिकेत भ्रष्टाचार झाला आहे. आजच्या प्रकारानंतर भ्रष्टाचारी लोकांना सत्तेवर राहण्याचा काडीचाही अधिकार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घ्यावी आणि तातडीने महापालिका बरखास्त करावी, पुढच्या निवडणुकीपर्यंत प्रशासक नेमावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली.

महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर आज (बुधवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ‘एसीबी’ने छापा टाकत अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या प्रकारानंतर कांबळे यांनी फेसबुक पोस्ट करत भाजपशासित पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ‘अँटी करप्शन’ची धाड! महापालिका ताबडतोब बरखास्त करा…अशी मागणी केली.

‘एमपीसी न्यूज’शी बोलताना मानव कांबळे म्हणाले, स्थायी समितीचा गोंधळ, मासळी बाजार वर्षानुवर्षे चालू आहे. मग, सत्तेवर कोणीपण असून द्यात. ना भय, ना भ्रष्टाचार, ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशा पद्धतीच्या वल्गना भाजपने केल्या. परंतु, मागच्या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नाही. त्याच्या कितीतरी अधिकपटीने भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाला आहे. खरं तर पालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या अध्यक्षांपासून आत्ताच्या अध्यक्षांपर्यंत सर्वांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे. संपत्ती आली कोठून, कशी आली. याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्यांच्या इतिहास सर्वांना माहिती आहे.

महापालिका हे पैसे खाण्याचे कुरण आहे असा राजकारण्यांचा समज आहे. आजपर्यंतच्या सर्व सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी महापालिकेकडे केवळ पैसे पुरविणारी यंत्रणा म्हणून उपयोग करुन घेतला. करदात्या नागरिकांना त्यांच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले. रस्ते, सार्वजनिक वाहतुकीची अवस्था, स्मार्ट सिटीत केलेला गोंधळ हे सर्व पाहिले तर या सगळ्यातून पैसे खाणे आणि आपली संपत्ती वाढविणे एवढाच उद्देश स्थायी समिती अध्यक्ष आणि त्यांच्या सदस्यांचा राहिला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी लोकांना सत्तेवर राहण्याचा काडीचाही अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दखल घ्यावी आणि तातडीने महापालिका बरखास्त करावी. पुढच्या निवडणुकीपर्यंत प्रशासक नेमावा, असेही कांबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.