Pimpri News: मास्कविना फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर आता माजी सैनिक कारवाई करणार

50 माजी सैनिकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मास्कविना फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी फिरणा-यांवर आता माजी सैनिकांची टीम कारवाई करणार आहे. कोविड उपद्रव निरीक्षक म्हणून सहा महिन्यांसाठी 50 माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या माजी सैनिकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन आणि दंड वसुलीवर 30 टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी (दि.7) स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या 85 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनावर अद्यापही लस आली नाही. त्यामुळे मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क वापरणे हीच लस असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहे. परंतु, अनेक नागरिक मास्कचा वापर करत नाहीत.

थुंकीतून विषाणूचा प्रसार होत आहे. असे असतानाही सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आता मास्कविना फिरणा-यांवर माजी सैनिक कारवाई करणार आहेत.

पालिका हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कविना फिरणा-या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिकांची नेमणूक केली जाणार आहे. पालिकेने पुण्यातील आर्मींचे ऑफिसर इनचार्ज यांच्यांशी पत्रव्यवहार केला होता. कोविड उपद्रव निरीक्षक म्हणून सहा महिन्यांकरिता तात्पुरत्या स्वरुपात दहा हजार मानधन व दंड वसुलीवर प्रोत्साहन भत्ता याप्रमाणे कामकाजासाठी 9 जुलै 2020 रोजी पत्रव्यवहार केला होता.

यावर आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनचे कर्नल जगभान सिंग यांनी 10 जुलै रोजी ई-मेलद्वारे 15 हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन भत्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी कर्नल जगभान यांच्याशी 14 जुलै रोजी बैठक घेतली.

त्यात कर्नल यांनी कोरोना प्रतिबंधात्मक पथकासाठी नियुक्त करण्यात येणा-या माजी सैनिकांसाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन आणि 30 टक्के प्रोत्साहन भत्ता मान्य केला. अतिरिक्त आयुक्त पवार यांनी केलेल्या सुचनेनुसार पथकासाठी 50 माजी सैनिकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

या कामकाजासाठी प्रति माजी सैनिक दरमहा दहा हजार मानधन खर्चानुसार तीन महिन्याकरिता 15 लाख रुपये खर्च येणार आहे. मानधन आणि प्रोत्साहन भत्याची प्रत्यक्ष होणारी रक्कम भांडार विभागातील कोविड निधीतून खर्च केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.