Nigdi Crime News: तहसील कार्यालयातील लिपिकाला मारहाण करणाऱ्याला अटक

Tehsil office clerk's beated accused Arrest

एमपीसी न्यूज – सरकारी कामासाठी पैशांची मागणी करत असल्याबाबत दिलेल्या एका तक्रार अर्जावर तहसीलदारांसमोर चौकशी सुरु असताना तक्रारदाराने तहसील कार्यालयातील लिपिकाला  मारहाण केली. मारहाण करणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.

हा प्रकार बुधवारी (दि. 7) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास अप्पर तहसीलदार कार्यालय, आकुर्डी येथे घडला.

अतुल काळूराम तापकीर (वय 45, रा. चोविसावाडी, च-होली बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी सुनील इरन्ना कास्टेवाड (वय 29, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हे आकुर्डी येथील तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड हद्दीतील जमीन संकलानाचा कार्यभार आहे.

निकम वस्ती, च-होली येथील जगनाथ ताजणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत त्यांच्या जमिनीचे बिनशेती परवाना करण्यासाठी तहसील कार्यालयात 29 जुलै रोजी अर्ज केला होता. त्याबाबत 7 सप्टेंबर रोजी अतुल तपकीर यांना विनिश्चीती सनद देखील देण्यात आली.

त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी ‘बिनशेती परवाना देण्यासाठी फिर्यादी सुनील कास्टेवाड हे प्रती गुंठा पाच हजार रुपयांची मागणी करत आहेत, असा तक्रार अर्ज अतुल तपकीर यांनी उपविभागीय अधिका-यांकडे केला.

तो अर्ज चौकशीसाठी उपविभागीय कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे आला. चौकशी करण्यासाठी अतुल तापकीर यांना 1 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आले. मात्र, तापकीर आले नाहीत. तापकीर 7 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आले.

तापकीर यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करत असताना सुनील यांना विचारले असता ‘त्यांना त्यांचा बिनशेती परवाना दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही’ असे सुनील यांनी स्पष्टीकरण दिले.

त्यावरून चिडून तापकीर यांनी फिर्यादी लिपिक सुनील यांना  कानाखाली मारली. सुनील यांना तहसीलदारांच्या केबिनवर ढकलून देत शिवीगाळ करीत  सरकारी कामात अडथला आणला. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

‘ यापुढे कोणत्याही इसमाने सरकारी कामात अडथळा आणल्यास त्याच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील. असे अडथळे आणण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत’, असा इशारा अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.