Vadgaon News : मावळ तहसीलदारांना उर्से टोल नाका व्यवस्थापना संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन 

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी आज वडगाव मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना उर्से टोल नाका येथील व्यवस्थापना संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी (1) येथील टोल नाक्यावर स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, म्हणजे त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. (2) स्थानिकांना एक तर पूर्ण टोल माफी असावी, आणि हे शक्य नसेल तर अल्प दरात मासिक पास उपलब्ध करून द्यावा. (3) टोल नाक्यावर कर्मचारी उद्धट स्वरूपाचे वर्तन करतात त्यामुळे त्याचे वादात रूपांतर होते. या गोष्टी नियंत्रणात आल्या पाहिजेत. (4) स्थानिकांच्या वाहनासाठी फास्ट टॅग स्कॅनर नसलेली स्वतंत्र मार्गिका असावी.

तहसीलदारांनी निवेदन स्विकारत यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रदीप नाईक यांना यावेळी दिले.

नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्याशी देखील टोल नाक्यासंदर्भातील मागण्यांविषयी चर्चा केली. त्यांनी देखील वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन नाईक यांना दिले.

प्रदीप नाईक यांच्या सोबत सदर निवेदन देते वेळी भाजप कार्यकर्त्या अस्मिता सावंत (सरदार) तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मधुकर भोसले हे देखील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.