Maval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – प्रस्तावित रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा विरोध असून प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा मावळ तालुका भारतीय किसान संघाने‌ दिला आहे.

प्रस्तावित रिंगरोडसाठी वडगाव येथील शासकीय विश्रामगृहात प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार सुनील शेळके, एमएसआरडीचे गणेश चौरे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, भूमीअभिलेख अधिकारी उर्मीला गलांडे, कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, वनविभागाचे अधिकारी सोमनाथ ताकवले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रिंगरोडसाठी तालुक्यातील धामणे, उर्से, आंबी, नाणोली, इंदोरी, सुदवडी, सुदुंब्रे यासह 10 ते 12 गावातून शेतकऱ्यांच्या जमिनीतून प्रस्तावित पुणे रिंगरोड जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकराव शेलार, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, अनंत चंद्रचुड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रिंगरोड साठी तालुक्यातील शंभरटक्के जमिनी बागायती आहेत. ह्या जमिनी गेल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या रिंगरोडला आमचा विरोध आहे. हा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा आंदोलन व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे विठ्ठलराव शिंदे, अरविंद शेवकर, दामोदर शिंदे, मंगेश ढोरे, दर्शन खांडगे व इतर शेतकरी उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, भंडारा डोंगराचे अस्तित्व टिकविण्यासाठी व धार्मिक भावना जपण्यासाठी मी शेतकऱ्यांबरोबर आहे. विरोधाला विरोध करू नका. सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम केले जाईल.  यावेळी जमीनीचा दर, संपादित, बागायती जमीनी या बाबत चर्चा झाली.

या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे म्हणाले भंडारा डोंगराला बोगदा न पाडता 2016 साली जो आंबी रिंगरोडचा सर्वे झाला होता. तोच रोड मोठा करा. म्हणजे बागायती जमीनी जाणार नाही. या वेळी प्रांत संदेश शिर्के यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.