Pimpri news: पन्नास हजार पिंपरी-चिंचवडकरांची कोरोनावर मात; कोरोनामुक्तांचे प्रमाण 78.65 टक्के

शहरातील 2.54 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला एक हजार ते बाराशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख असून त्यापैकी 63 हजार 622 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 2.54 टक्के आहे. बाधितांपैकी तब्बल 50 हजार 41 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.65 टक्के आहे. तर, सुमारे 12 हजार सक्रिय रुग्ण असून त्याचे प्रमाण 18.86 टक्के आहे. आजपर्यंत 1039 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.63 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, अर्धा मे महिना परिस्थितीवर महापालिका नियंत्रण ठेवू शकली. रुग्ण संख्या आटोक्यात राहिली. परंतु, मे महिन्याच्या मध्यानंतर शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली.

दिवसाला 100 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत होते. त्यांनतर जून, जुलै, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली. सप्टेंबरमध्ये देखील रुग्णवाढ सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

दिवसाला एक हजार ते बाराशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरातील रुग्णसंख्या वाढत असून सक्रिय रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखाच्या आसपास आहे. 10 मार्च ते 13 सप्टेंबरपर्यंत शहरातील 63 हजार 622 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 2.54 टक्के आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

आजपर्यंत 50 हजार 41 जणांनी कोरोना विरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.65 टक्के आहे. आजमितीला सुमारे 12 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचे प्रमाण 18.86 टक्के आहे.

तर, शहरातील 1039 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. त्याचे प्रमाण 1.63 मृत्यूचे आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाला 20 ते 25 जणांचा मृत्यू होत आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 25,689 युवकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 19, 605 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 60 वर्षापुढील 8237 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 5476 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 5212 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

सक्रिय 8266 रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत !

शहरात आजमितीला सुमारे 12 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 8266 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. प्रशासनाकडून ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

तर, लक्षणे नसलेले रुग्ण कोरोनावाहक होऊ शकतात,  असे सांगत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तर, 1 हजार रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. 148 रुग्णांची प्रकृती गंभीर असून 85 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.