Pimpri News : क्रीडा विभागासाठी स्वातंत्र्य स्थापत्य विभाग हा ऐतिहासिक निर्णय – प्रा. उत्तम केंदळे

एमपीसीन्यूज : क्रिडा विभागासाठी वेगळा व स्वतंत्र असा स्थापत्य विभाग देण्याची गेल्या कित्येक वर्षाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. त्यामुळे क्रिडा योजनांना बळ मिळून त्यासाठीच्या सुविधा आता अधिक लवकर व दर्जेदार होतील, असा विश्वास पालिकेचे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक सभापती उत्तम केंदळे यांनी व्यक्त केला आहे.

तसेच यावर्षीच्या महापालिकेच्या बजेटमध्ये क्रीडा विभागासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष प्रथमच तयार केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या मागणी मान्य करून घेण्यात क्रीडापटू असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा मोठा वाटा असल्याचे केंदळे यांनी सांगितले.

दरम्यान, स्वतंत्र लेखाशिर्षामुळे क्रीडा विभागासाठी एकूण बजेटच्या पाच टक्के तरतूद होणार असून पन्नास कोटी रुपये क्रीडा विभागाला मिळणार असल्याची माहिती केंदळे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी उपायुक्त संदीप खोत आणि कार्यकारी अभियंता सुनील वागुंडे उपस्थित होते.

यामुळे आता क्रिडा विभागासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता आणि आठही प्रभागात फक्त क्रिडा विभागाचाच कार्यभार असलेले उपअभियंता असणार आहेत.परिणामी प्रभाग पातळी व शहराचे क्रीडा प्रकल्प वेगाने मार्गी लागणार असून त्यात त्रूटीही राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या मागण्या मान्य केल्याबद्दल नुकतेच बदली व पदोन्नती झालेले पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे क्रीडा सभापतींनी आभार मानले. तसेच त्यासाठी यापूर्वीच्याही क्रीडा सभापतींचा पाठपुरावा असल्याचे त्यांचाही या यशात सहभाग आहे, असेही त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले.

गरीब कुटुंबातील खेळाडूंना लाभ होईल,या पद्धतीने क्रिडा धोरणात बदल करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. खेळाडूंना विमा योजना (मेडीक्लेम)धोरण तयार करणार असून स्मार्ट सिटी अंतर्गत काही क्रीडा प्रकल्प राबविले जाणार आहे. शहरासाठी पालिकेची क्रीडा अकादमी स्थापन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.