Pimpri News: शहरातील दुकाने उघडण्यास सकाळी 11 ते 5 वेळ द्या; पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एक जूनपासून ‘ब्रेक द चेन 3’ अंतर्गत सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने उघडण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली आहे. परंतू, सकाळी 7 ते 11 पर्यंत ग्राहक येतच नाहीत. त्यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे मागील आर्थिक वर्षात अनेकदा लॉकडाऊनमुळे दुकाने बंद ठेवावी लागली. आता एक जूनपासून अंशता दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल फेडरेशनच्या वतीने आयुक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. परंतू, सकाळी 7 ते 11 पर्यंत ग्राहक येत नसल्यामुळे चार तास विनाकारण वाया जातात.

त्याऐवजी दुकाने उघडण्यास 11 ते 5 अशी परवानगी दिल्यास व्यापा-यांची तसेच ग्राहकांचीही सोय होईल. आयुक्त तसेच महापालिकेच्या पदाधिका-यांनीही व्यापा-यांच्या या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. तसेच सर्व व्यापा-यांनी शासनाने कोविड विषयीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.