Pimpri News : आठ दिवसात सर्व मागण्या पूर्ण करा; अन्यथा कायदेभंग आंदोलन करु – बाबा कांबळे

रिक्षा चालक -मालकांचे पिंपरीत बोंबाबोंब आंदोलन

एमपीसी न्यूज – विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. रिक्षाला व्यवसाय करण्यासाठी खुली परवानगी देऊन आठ दिवसात सर्व मागण्या पूर्ण करा; अन्यथा कायदेभंग आंदोलन करु, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे, कुणाल वावळकर, बाळासाहेब सोनवणे, इजाज शेख, बाळासाहेब ढवळे, वकील शेख, दत्तू सरकते, आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले,  राज्य सरकारने एसटी बसला तसेच मुंबईमध्ये बेस्टला व पुण्यात पीएमसी बस वाहतुकीस परवानगी दिली आहे. परंतु, रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंधने घालण्यात आली आहेत. आज रोजी 70 टक्के रिक्षा बंद आहेत.

गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी. रिक्षाचालकांच्या मागण्या सोडवाव्यात; अन्यथा रिक्षाचालक सविनय कायदेभंग आंदोलन करतील आणि तोपर्यंत बोंबाबोंब आंदोलन सुरूच राहील असे कांबळे म्हणाले.

दरम्यान, रिक्षा चालकांच्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय अवतारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

काय आहेत रिक्षा-चालकांच्या मागण्या ?

* रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार अनुदान मिळावे.

* शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे, तसेच आरसी बुक कोरे करावे.

* मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेरवर निर्बंध आणावेत.

* रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे‌..

* फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुली साठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्तीची वसुली आणि दादागिरी करू नये असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत.

* रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी.

* रिक्षा चालक मालकांसाठी कोरोनाच्या काळात 50 लाखाचा विमा मिळावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.