Pimpri News: राहण्यायोग्य शहरात पिंपरी चिंचवड देशात 16 व्या स्थानी; महापालिका कामकाजात चौथा क्रमांक

एमपीसी न्यूज – केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने आज देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली आहे. राहण्यायोग्य शहरामध्ये पिंपरी-चिंचवड देशात 16 व्या स्थानी आहे. तर महापालिकेच्या कामकाजात चौथे स्थान पटकाविले आहे. दरम्यान, मागीलवर्षी राहण्यायोग्य शहरात पिंपरी-चिंचवड शहराचा 67 वा क्रमांक होता.

नागरिकांना त्यांच्या महापालिका क्षेत्रात उत्तम दर्जाचे व योग्य राहणीमान निर्माण व्हावे, या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ”म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) 2020” मध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशपातळीवर चौथे स्थान पटकावले आहे.

म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) 2020 ठरवताना कोणत्याही शहराचा महत्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या गव्हर्नन्स म्हणजेच प्रशासकीय कारभार या निकषासाठी पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल ठरले आहे. ‘इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स (ईओएलआय) 2020’ मध्येही शहराच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून, देशातील ‘टॉप ट्वेन्टी’ शहरांमध्ये 16 वे स्थान पिंपरी-चिंचवड शहराला मिळाले आहे.

‘इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स (ईओएलआय) 2020’ आणि ‘म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) 2020’ च्या क्रमवारीची घोषणा आज केंद्राच्या वतीने करण्यात आली. गृहनिर्माण व शहरी कामकाज राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज ऑनलाइन कार्यक्रमात या अंतिम क्रमांकाची घोषणा केली.

_MPC_DIR_MPU_II

असे झाले सर्वेक्षण

या सर्वेक्षणासाठी सरकारकडून 14 कॅटेगरी बनवल्या होत्या. त्यात शहराचा शैक्षणिक विकास, आरोग्य सोयी सुविधा, राहण्यासाठी कितपत योग्य आहे, आर्थिक विकासाचा स्तर, ट्रान्सपोर्ट, स्वच्छता, पर्यावरण, रोजगाराची संधी, हरित क्षेत्र, इमारती, प्रदुषण याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 32 लाख 20 हजार लोकांनी त्यांचे मत नोंदवले. या सर्वेक्षणात 111 शहरांनी सहभाग घेतला होता.

प्रशासन व प्रशासनातील कामकाजावरील विश्वासाची पावती – आयुक्त

“प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविणेसाठी आवश्यक आहे. ‘इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स (ईओएलआय) 2020’ आणि ‘म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) 2020’ द्वारे प्राप्त होणा-या माहितीमुळे महापालिकेतर्फे नागरिकांना शहराबद्दल नेमके काय वाटते. पालिकेतर्फे देण्यात येणा-या सुविधांबाबत नागरिकांचे मत काय आहे, हे जाणून घेणे शक्य झाले आहे.

‘म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) 2020’ मध्ये देशपातळीवर शहराला मिळालेला चौथा क्रमांक हा नागरिकांची प्रशासन व प्रशासनातील कामकाजावरील विश्वासाची पावती आहे. नागरिकांना शहरात राहण्यायोग्य सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रशासनातील नागरिकांचा सहभाग वाढविणे हेच आता महापालिकेचे मुख्य उद्दिष्ट असेल, असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.