Pimpri news : वड, पिंपळ,कडुनिंब, चिंचेची झाडे लावा; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांना कळले आहे. त्यासाठी महापालिकेने शहरात पुन्हा वड, पिंपळ, कडुनिंब, चिंचेची झाडे लावावीत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी केली आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात एकेकाळी वड, पिंपळाची मोठी झाडे होती. पिंपळ 100 टक्के, वड 80 टक्के, कडुलिंब 75 टक्के, चिंच 68 टक्के झाडे कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि परिसर शांत आणि पर्यावरण पूरक ठेवतात.

कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व जनतेला आणि सरकारला कळले आहे. औद्योगिक विकास, शहरीकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरातील अनेक जुन्या वृक्षांना अडथळा समजून तोडून टाकण्यात आले. त्यावेळी काही संवेदनशील लोकांनी आंदोलने केली होती. शहर हिरवेगार करण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष सवर्धन आणि पर्यावरण खात्याने आधुनिक शोभिवंत आणि भरपूर पाणी शोषणारी झाडे लावून शहर हिरवे केले आहे. परंतु, शहरातील प्रदूषण कमी झाले नाही. त्यामुळे शहरात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंचेची झाडे लावावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.