Pimpri News: पिंपरी चिंचवडमध्ये प्लाझ्माचा तुटवडा; सहा रक्तपेढ्यांमध्ये सोळा पिशव्या शिल्लक

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच शहरात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील सहा रक्तपेढ्यांमध्ये सोळा बॅग शिल्लक आहेत. परिणामी, रुग्णांचा नातेवाईकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची स्थिती आहे.

कोरोनाच्या रुग्णाला कोणती लक्षणे आहेत, त्यावरून उपचार केले जातात. ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत त्यांना इतर औषध उपचार लागू पडत नाही. अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली जाते. विशेषतः वयोवृद्ध नागरीकांना प्लाझ्मा दिला जातो. परंतु, सध्या प्लाझ्मा दाते कमी झाल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे.

तुटवडा असल्याने ‘प्लाझ्मा दान करणारा दाता घेऊन या आणि मग प्लाझ्मा घेऊन जा’, असे रक्तपेढीतील कर्मचारी सांगत आहेत. सुरुवातीला प्लाझ्मा दानाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. दान करणाऱ्या दात्यांची संख्या वाढली होती. या थेरपीमुळे अनेक रुग्ण बरे देखील झाले आहेत.

नोव्हेंबर नंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. शहरातील रुग्णांचा आकडा हा शंभरच्या खाली आला होता. त्यामुळे कोरोना शहरातून हद्दपार झाला अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्लाझ्मा दानाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

परंतु पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रोज 1400 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा नागरिकांना प्लाझाची गरज भासत आहे.

‘हे’ करू शकतात प्लाझ्मा दान

कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आल्यापासून 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लाझ्मा दान करता येते. एका वेळेस 400-500 मिली प्लाझ्मा दान करता येतो. त्यानंतर साधारण 15 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळेस प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा दान केल्याने कोणताही त्रास होत नाही, असे तज्ज्ञचे म्हणणे आहे.

प्लाझ्माची मागणी वाढली पण दात्यांचे प्रमाण कमी – डॉ. शंकर मोसलगी

‘वायसीएमएच’मधील रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी म्हणाले, ”सध्या प्लाझ्माचा मोठा तुटवडा आहे. मागणी जास्त आहे. पण, दाते कमी आहेत. दररोज 40 जणांकडून प्लाझ्माची मागणी केली जात आहे. आम्ही दिवसाला 15 ते 18 जणांनाच प्लाझ्मा देवू शकत आहोत. आता दातेच पुढे येत नाहीत. दुसरे म्हणजे हेल्थ वर्कर यांनी कोरोनाची लस घेतली आहे. लस घेतल्यामुळे ते 56 दिवस प्लाझ्मा देवू शकत नाहीत.

पूर्वी हेल्थ वर्कर, पोलीस जास्त संख्येने पॉझिटीव्ह होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान केले. पण, आता या सर्वांना कोरोनाची लस दिल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका प्लाझ्मापासून दोन बॅग तयार होतात. त्यामुळे दोघांना प्लाझ्मा देवू शकतो. प्लाझ्मा दात्यांनी पुढे येणे आवश्यक आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.