Pimpri news: अतिरिक्त आयुक्तांचे आर्थिक अधिकार काढून घेतले

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे 'कारकुनी' काम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागांकडील निविदा विषयक आर्थिक, कोरोनाची बिले अदा करण्यासंदर्भातील संपूर्ण अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडे केवळ प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज देण्यात आले आहे. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनीही केवळ प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज करावे, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

एकही रुग्ण दाखल नसताना स्पर्श हॉस्पिटलला तीन कोटी 18 लाखांचे बिल अदा केले. ऑक्सिजन पुरवठादार गॅब संस्थेला दिलेले 15 वर्षासाठीचे कंत्राट यावर मंगळवारी झालेल्या महासभेत घमासान चर्चा झाली. अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर नगरसेवकांनी गंभीर आरोप केले.

त्या आरोपांची दखल घेत महापौर उषा ढोरे यांनी पवार आणि रॉय या दोघांचे सर्व अधिकार तत्काळ काढून घ्याण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करत आयुक्तांनी अधिकार काढून घेतले आहेत.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे 17 विभागांचे कामकाज सोपविण्यात आले आहे. पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागामार्फत करण्यात येणारे सर्व निविदा प्रक्रियेविषयक कामकाज निरस्त करण्यात आले आहे. यापुढे त्यांच्याकडील सर्व विभागांचे निविदा विषयक कामकाज संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांमार्फत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागांच्या विभागप्रमुखांनी यापूर्वी लेखा व प्रशासन विभागाने प्रदान केलेले अधिकार त्यांच्या कार्यकक्षेपुरते वापरावेत. त्यापुढील अधिकारा संदर्भातील कामकाजाच्या नस्ती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर कराव्यात.

निविदा विषयक कामकाज निरस्त केल्याने पवार यांनी सोपविण्यात आलेल्या विभागांचे उर्वरीत प्रशासकीय कामकाज करावयाचे आहे. अतिरिक्त आयुक्त पवार यांच्याकडे कोविड 19 विषयक सोपविण्यात आलेल्या कामकाजासंदर्भातील निविदा विषयक तसेच बिले अदा करण्यासंदर्भातील संपूर्ण कामकाज काढून घेतले असून, अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांच्याकडे हे कामकाज देण्यात आले आहे.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे ‘कारकुनी’ काम

आरोग्य, किटकनाशक, स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियानाकडील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना प्रदान केलेले सर्व आर्थिक अधिकार पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना प्रदान करण्यात आले होते.

आता पवार यांचेही निविदा प्रक्रीयेविषयक कामकाज काढून घेतले आहेत. या विभागांचे सर्व निविदा विषयक कामकाज आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर करण्यास मान्यता दिली आहे.

आरोग्य कार्यकारी अधिका-यांनी यापूर्वी लेखा व प्रशासन विभागाने प्रदान केलेले अधिकार त्यांच्या कार्यकक्षेपुरते वापरावेत. त्यापुढील अधिकारा संदर्भातील कामकाजाच्या नस्ती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर कराव्यात. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज करावे, असे आदेशात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.