Pimpri News : रिक्षा पंचायतचे रिक्षा बंद आंदोलन अविवेकीपणाचे – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – एक ऑक्टोबर रोजी रिक्षा पंचायतच्या वतीने रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. हा संप म्हणजे अविवेकीपणा असून याचे दूरगामी परिणाम होतील, असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे सहा महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसाय संप करून बंद करणे म्हणजे रिक्षा बंदची आपली मक्तेदारी अबाधित करण्याचा हा प्रकार आहे. रिक्षा पंचायतने अनेक वर्षे पुणे शहरातील रिक्षा चालकांचे नेतृत्व केले आहे.

अनेक वेळा बंद व संप केला आहे. परंतु योग्य वेळी योग्य भूमिका न घेतल्यामुळे आणि यापूर्वी आचारसंहितेच्या काळात संपा सारखे आंदोलन केल्यामुळे रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, असे मत कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालक रिक्षा पंचायत सोडून बाबा कांबळे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र रिक्षा पंचायतमध्ये सहभागी होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात 90 टक्के रिक्षा स्टँड हे बाबा कांबळे यांच्या महाराष्ट्र पंचायतशी सलग्न आहेत, तर पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सभासद होत आहे.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतने 30 सप्टेंबर रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आणि महाराष्ट्रात रिक्षा चालकांच्या प्रश्नावर बोंबा बोंब आंदोलन आयोजित केले आहे.

या आंदोलनास रिक्षा चालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरात देखील प्रत्येक रिक्षा स्टँडवर आंदोलनाची तयारी सुरू आहे. बाबा कांबळे यांच्या महाराष्ट्र रिक्षा पंचायतीस पुणे शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

यामुळे गोंधळाच्या भरात रिक्षा पंचायत आणि त्यांच्या नेत्यांनी घाईघाईत अविवेकीपणाचा निर्णय घेतला असल्याचा आरोप बाबा कांबळे केला आहे.

महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालकांसाठी टास्क फोर्स स्थापन केले आहे. यात रिक्षा पंचायतचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबा आढाव यांना सदस्य म्हणून घेतले आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत रिक्षा पंचायतच्या वतीने नितीन पवार यांनी प्रतिनिधित्व केले आहे. या ठिकाणी देखील रिक्षा पंचायतने रिक्षा चालकांचे प्रश्न तडीस नेले नाहीत.

तसेच नुकतीच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची रिक्षा पंचायत अध्यक्ष यांनी भेट घेतली. यावेळी हमालाच्या बरोबरीने रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले असते तर त्यांना न्याय मिळाला असता.

परंतु, या बैठकीत रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर चर्चा सुद्धा केली गेली नाही. आता रिक्षा चालकांना पुढे करून शासनाच्या विरोधात असलेल्या रिक्षा चालकांचा रोश कमी केला जात आहे, अशी टीका कांबळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.