Pimpri News: अंतर्गत मतभेदांमुळे सत्ताधारी भाजपचे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष – राजू मिसाळ

सत्ताधारी भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही

राजशिष्टाचाराप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेची सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढावी

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेची सोडत राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते काढण्यात यावी; अन्यथा सोडतीचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिला आहे. सत्ताधारी भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही. अंतर्गत मतभेदामुळे सत्ताधारी भाजपला शहरातील प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकृष्ट्या दुर्बल घटांसाठी च-होली, बो-हाडेवाडी व रावेत येथील नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची सगणकीय सोडत सोमवार होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत होणार आहे. पण, त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे.

पालकमंत्री असताना ज्यांनी आपल्या शहरासाठी काहीही केलेले नाही त्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या संगणकीय सोडतीचा घाट कशासाठी ? असा सवाल विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे.

वस्तुतः या प्रल्पाचे काम सरासरी 20 टक्क्यांपर्यंतच झाले आहे. सर्व प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यातच रावेत प्रकल्पाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. असे असताना सदनिकांची संगणकीय सोडतीची घाई सत्ताधारी भाजप पदाधिकारी का करीत आहेत ?.

शहरातील गोर गरीब जनतेला आशेला लावून ठेवण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एका वर्षावर आली असताना आम्हीच कसे जनतेच्या हिताची कामे करीत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप पक्ष करीत आहे.

मागील चार वर्षे अपवादात्मक एखादा प्रकल्प सोडल्यास एकही नाव घेण्याजोगा प्रकल्प सत्ताधा-यांनी राबविला नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे मागील चार वर्षांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्यातच त्यांचा वेळ जात आहे. शहरातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षांत मंजूर केलेले प्रकल्पांची उद्घाटने करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही मिसाळ यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.