Pimpri News: मेट्रो स्थानक परिसरात कामगारांचे शिल्प, उद्योगनगरीच्या माहितीचे  फलक लावा – काशिनाथ नखाते

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , सीईओ यांचेकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आले. येथे कारखाने ही आले, कामगारनगरी, उद्योगनगरी म्हणून अवघ्या विश्वामध्ये शहर प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे  मेट्रो स्थानक परिसरात कामगारांचे शिल्प, उद्योगनगरीच्या माहितीचे  फलक लावावेत अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे  अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली.

 

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यात नखाते यांनी म्हटले आहे की, 1970  कालावधीपासून टेल्को, बजाज, महिंद्रा अँड महिंद्रा, कायनेटिक , थरमॅक्स, थायसन ग्रुप , केएसबी पंप,  ग्रीव्हज , रेकॉल्ड,  फिनोलेक्स, गरवारे वॉल रोप,    सैंडविक एशिया अशा मोठमोठ्या आणी छोट्या  कंपन्यांमध्ये लाखोंच्या संख्येने कामगारांनी हे शहर वाढवण्यासाठी, प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न केले. हे शहर उभारणीमध्ये कष्टकरी कामगारांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर या शहरातील असंघटीत वर्गानेही  श्रम केले आहेत. देशाच्या आर्थिक सकल उत्पन्नाच्या 65 %  टक्के हिस्सा हा  कष्टकऱ्यांच्या श्रमातून निर्माण होतो. इथल्या कष्टकरी कामगारांचे योगदान लक्षात घेता  स्थानक आणि जिने व प्रमुख मार्गावर कष्टकरी कामगारांचे शिल्प उभारण्यात यावे. त्याचबरोबर कामगार आणी कामगारनगरी,औद्योगिक नगरीचे भित्तिचित्र, फलक  ही लावण्यात यावे. यातून या कामगार नगरीचा उद्योग नगरीचा इतिहास प्रवाशी  नागरिकांसमोर येईल.

 

पुणेमेट्रो   पिंपरी-चिंचवड मेट्रोच्या सर्व स्थानकावरुन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी या सामान्य रिक्षाचालक यांच्याच  रिक्षा सुरू करण्यात याव्यात.  त्याचबरोबर या स्थानकावरती फळे,भाजी ,विक्री चहा नाष्टा केंद्रासाठी सुद्धा शहरातील  सामान्य विक्रेते फेरीवाले यांना  सामाऊन घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर येथे लागाणारे मजूर, हमाल कंत्राटी  पद्धतीने न भरता थेट कामगारांचा  समावेश करून घ्यावा.  अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे करण्यात आली आहे .काशिनाथ नखाते,  चंद्रकांत कुंभार ,  राजेश माने , सलीम डांगे,   भास्कर राठोड, इरफान चौधरी यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.