Pimpri News : विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेलं पाकिट मूळ मालकाचा शोध घेऊन केले परत

एमपीसी न्यूज – रस्त्यावर सापडलेलं पाकिट विद्यार्थ्यांने मूळ मालकाचा शोध घेऊन परत केले आहे. पाकिटात असलेल्या एका संपर्क क्रमांकावर संपर्क साधून संबंधित मालकाचा संपर्क क्रमांक मिळवून दीड महिन्यानंतर हे पाकिट परत केले आहे.

‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांचे हे पाकिट होते. विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे पाकिट परत केल्याबद्दल इनामदार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

प्रतीक रवींद्र कांबळे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो ‘बीसीए’च्या अंतिम वर्षात शिकत आहे. दीड महिन्यांपूर्वी ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांचे पाकिट प्रवासादरम्यान कासारवाडी परिसरात हरवलं होतं. प्रतीक कांबळे याला ते सापडले होते. पाकिटात पॅन कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, आधारकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पण पाकिट परत करायचं तर संपर्क कसा साधायचा असा प्रश्न प्रतीक पुढे होता. यादरम्यान प्रतीकने विविध प्रयत्न केले पण त्याला विवेक इनामदार यांचा संपर्क क्रमांक मिळू शकला नाही.

संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी प्रतीकचे प्रयत्न सुरूच होते. यादरम्यान दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला. पाकिटातील सर्व कागदपत्रं पुन्हा एकदा बारकाईने बघितल्यानंतर प्रतीकला त्यामध्ये एक संपर्क क्रमांक सापडला यावर संपर्क साधून त्याने घडलेली हकीकत संबंधित व्यक्तीला सांगून इनामदार यांचा संपर्क क्रमांक मिळविला.

दरम्यान, आज (बुधवारी) प्रतीक कांबळे व सौरभ कांबळे यांनी इनामदार यांना प्रत्यक्ष भेटून पाकिट परत केले. दीड महिन्यानंतर विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे पाकिट परत केल्याबद्दल त्यांनी प्रतीकचे मनापासून आभार मानले.

पाकिटात अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात. एकदा हारवल्यानंतर ती परत मिळवण्यासाठी खर्च येतो आणि मानसिक त्रासही होतो. त्यामुळे मूळ मालकाला त्याचं पाकिट मिळावं या विचाराने व माणुसकीच्या नात्याने पाकिट परत केल्याची भावना प्रतीक कांबळे याने व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.