Pimpri News: आमदार अण्णा बनसोडे यांच्या मागणीला यश, आवास योजनेसाठीची अनामत रक्कम परत देण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्लब घटकांसाठी राबविण्यात आलेल्या गृहप्रकल्पाच्या निवड अथवा प्रतिक्षा यादीत नाव नसलेल्या अर्जदारांची अनामत रक्कम परत देण्यास सुरुवात झाली आहे. अनामत रक्कम परत करण्याची मागणी आमदार अण्णा बनसोडे केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर मिळण्यासाठी अनेक गोरगरीबांनी अर्ज केले होते. यामध्ये 3664 सदनिकांसाठी एकूण 48 हजार नागरिकांनी अर्ज भरले होते. त्याकरिता 5000 रुपये नागरिकांकडून अनामत रक्कम म्हणून घेण्यात आलेली होती.

मात्र, या सोडतीत ज्यांचे नाव आलेले नाही, अशा नागरिकांची अनामत रक्कम त्यांना परत करावी, या मागणीचे निवेदन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले होते.

पंतप्रधान आवास योजनेअतर्गत घरांच्या सोडतीच्या यादीत नाव न आल्याने नागरिकांची निराशा झालेली आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिकस्थिती खूपच बिकट होत चालली आहे. पंतप्रधान आवास योजनेतील लॉटरीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांनी अनामत रक्कम म्हणून भरलेले 5 हजार रुपये तातडीने त्यांच्या बँक ख्यात्यात जमा करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी निवेदनामार्फत केली होती.

या निवेदनाची दखल घेत महापालिकेने प्रतीक्षा यादीत नाव नसलेल्या 21 हजार अर्जदारांचे पाच हजार रुपये पालिकेने परत केले आहेत. उर्वरित अर्जदारांची अनामत रक्कम परत करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.