Pimpri News: ‘स्विमिंग’ महागले! जलतरण तलावाच्या शुल्कात तिपटीने वाढ

स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावांच्या शुल्कांमध्ये तिपटीने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे दैनंदीन शुल्कापोटी 10 रुपयाऐवजी आता 30 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, वार्षिक शुल्क एक हजार रुपयांवरून तीन हजार रूपये होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) स्थायी समितीने मान्यता देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने नागरिकांसाठी 12 जलतरण तलाव चालविले जातात. 12 जलतरण तलावापासून महापालिकेला सन 2017-18 मध्ये 62 लाख 98 हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर, सन 2018-19 मध्ये 68 लाख 19 हजार रुपये उत्पन्न मिळाले. तसेच 12 जलतरण तलाव चालविण्यासाठी सन 2017-18 मध्ये 4 कोटी 81 लाख रुपये खर्च झाला. त्यामध्ये 12 तलावांवर प्रत्येकी एक लिपिक आणि चार जीवरक्षक यांच्या वेतनावर 1 कोटी 73 लाख 20 हजार रूपये खर्च झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर 64 लाख 76 हजार रुपये, स्थापत्यविषयक कामांवर अंदाजे 46 लाख 94 हजार रूपये, विद्युत बीलांसाठी 70 लाख 37 हजार रुपये, जलतरण तलावावरील पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल आणि यांत्रिक देखभाल दुरूस्तीसाठी 1 कोटी 25 लाख 84 हजार रुपये या खर्चाचा समावेश आहे.

महापालिकेला वर्षभरात 12 जलतरण तलावापासून 62 लाख 98 हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर, 12 जलतरण तलाव चालविण्यासाठी वर्षभरात 4 कोटी 81 लाख रुपये खर्च झाला. म्हणजेच पालिकेवर 4 कोटी 18 लाखाचा वार्षिक बोजा पडला. 2014 पासून आजतागायत जलतरण तलावासाठी 12 वर्षाखालील मुलांसाठी तिमाही 200 रुपये, सहामाही 350 रुपये आणि वार्षिक 500 रुपये दर आकारला जातो. 12 वर्षावरील व्यक्तींसाठी तिमाही 400 रुपये, सहामाही 700 रुपये आणि वार्षिक 1000 रूपये दर आकारला जातो. तसेच अपंग, महापालिका कर्मचारी स्वत:, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांसाठी सर्वसाधारण दरापेक्षा 50 टक्के सवलत दिली जाते. तर, एका व्यक्तीसाठी गेस्ट तिकीट म्हणून प्रति दिन एका वेळेसाठी 10 रुपये शुल्क आकारले जाते.

जलतरण तलावाचे मिळणारे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने ही तफावत कमी करण्यासाठी जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, दैनंदिन शुल्क 10 रुपयांवरून 30 रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. सर्वसाधारण मासिक शुल्क 600 रुपये, त्रैमासिक शुल्क 1200 रुपये, सहामाही शुल्क 2100 रुपये आणि वार्षिक शुल्क 3000 रुपये होणार आहे. एक वेळचे सभासद शुल्क व नोंदणी शुल्क 300 रुपये केले जाणार आहे. नेहरूनगर जलतरण तलावावर सराव, शिबीर अथवा स्पर्धांसाठी सार्वजनिक संस्था, शाळा, कॉलेज, कंपनी, क्लब यांना एक तासासाठी 1500 रुपये आणि इतर जलतरण तलावांवर एक तासासाठी 1200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थी खेळाडूंना जलतरण प्रशिक्षण शुल्कासाठी एक तासासाठी मासिक 1500 रुपये शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.

18 वर्षाखालील मुले-मुलींना मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक शुल्कामध्ये सर्वसाधारण शुल्काच्या 50 टक्के सवलत राहील. महापालिका अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांसाठी सर्वसाधारण दरापेक्षा 50 टक्के सवलत दिली जाईल. महापालिका नगरसेवक, खेळाडू दत्तक योजनेतील खेळाडू, महापालिका शाळेतील विद्यार्थी खेळाडू, दिव्यांग विद्यार्थी – नागरिक यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यानुसार, जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ केली जाणार आहे. तसेच जलतरण तलाव पाच वर्षे भाडेकराराने चालविण्यास देण्यात येणार आहे. या विषयाची महापालिका सभेकडे शिफारस करण्यात आली आहे.

शुल्क सध्याचे दर प्रस्तावित दर

#दैनंदीन शुल्क 10, 30
#त्रैमासिक शुल्क 400, 1200
#सहामाही शुल्क 700, 2100
#वार्षिक शुल्क 1000, 3000
#लॉकर शुल्क 100, 300

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.