Pimpri News: …तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते : आयुक्त राजेश पाटील

x

एमपीसी न्यूज – सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णसंख्येचे प्रमाण कमी असले, तरी कोविड संबंधित नियमांचे पालन न केल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जात असताना नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले. तसेच सुपर स्प्रेडर्सने दर 15 दिवसांनी कोरोनाची चाचणी करावी, असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र.21 आणि 23 मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रभाग स्तरावरील समस्या,पावसाळी कामे, अतिक्रमण तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कोरोना विषयक नियोजन अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता विचारात घेता महापालिकेने आवश्यक बाबींचे व्यवस्थापन करण्याचे काम सुरु केले आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने त्यांचे नियमित लसीकरण करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. महापालिकेने यासाठी मोहिम सुरु केली आहे. यामध्ये बालकांचे आणि गर्भवती मातांचे नियमित लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्यांमध्ये अॅन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. ज्यांना कोविड संक्रमण झाले नाही अशा आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे शासनाने निर्धारीत केलेल्या वयोगटानुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घ्यावे.

सुपर स्प्रेडर्सने दर 15 दिवसांनी कोरोनाची चाचणी करावी. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय दादेवार यांनी बैठकीत माहिती दिली.

बैठकीस ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या मनिषा पवार, अर्चना बारणे, उषा वाघेरे, निकिता कदम, नगरसदस्य संदीप वाघेरे, अभिषेक बारणे, स्वीकृत सदस्य संदीप गाडेकर, ग क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, देवन्ना गट्टूवार, अनिल शिंदे, सुनिल वाघुंडे, बाबासाहेब गलबले, दत्तात्रय रामगुडे, अनिल सुर्यवंशी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी, डॉ. अभय दादेवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू बेद, आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.