Pimpri news: ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवा, मृत्यूदर कमी करा – शरद पवार

राज्य सरकारकडून जी मदत लागेल ती सर्व देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. 

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान 20 लोकांचे ट्रेसिंग करावे. तसेच टेस्टिंग वाढविण्यात यावे. यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर कमी करा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य सरकारकडून जी मदत लागेल ती सर्व देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

शरद पवार आज (गुरुवारी) सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेत दाखल झाले. त्यांनी पालिकेच्या कोरोना वॉर रूमला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला.

बेड, कोविड केअर सेंटर, रुग्णांला किती वेळात दाखल करून घेऊन उपचार केले जातात याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी श्री पवार यांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

महापौर उषा ढोरे, माजी आमदार विलास लांडे, जेष्ठ नेते आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, डब्बू आसवानी, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयूर कलाटे, श्याम लांडे, फजल शेख, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील किती लोकांचे ट्रेसिंग केले जाते, असे पवार यांनी विचारले असता 14 लोकांचे ट्रेसिंग केले जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यावर ट्रेसिंग वाढवा. 14 नव्हे तर 20 लोकांचे ट्रेसिंग करावे. चाचण्या वाढविण्यात याव्यात. यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, असे श्री पवार यांनी सांगितले.

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर, रुग्णवाहिकेचे नियोजन व्यवस्थित करावे. पुण्यात पत्रकाराचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. कोणाचाही असा मृत्यू होता कामा नये. राज्य सरकारकडून काही मदत लागली तर सांगा. आवश्यक ती मदत केली जाईल, असे श्री पवार यांनी सांगितले.

आजही अनेक नागरिक मास्कविना फिरत असल्याचे दिसत आहे. त्याबाबत जनजागृती करा, अशी सूचनाही श्री पवार यांनी केली. त्यावर मास्क न घालणाऱ्याविरोधात कारवाई केली जात आहे. कोरोना सुरू झाल्यापासून मास्कविना फिरणाऱ्याकडून तब्बल दोन कोटींचा दंड वसूल केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.