Pimpri News: पाणीबचतीचे धोरण कायमस्वरूपी हवे – सुरेश कंक

एमपीसी न्यूज – उन्हाळ्याला प्रारंभ झाला की महापालिकेकडून पाणीपुरवठा काटकसरीने केला जातो. पण, ही वेळ येऊ नये यासाठी पाणीबचत हे धोरण कायमस्वरूपी हवे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश कंक यांनी व्यक्त केले.

उन्हाळ्यात पाणीपुरवठा काटकसरीने केला जातो. या पार्श्वभूमीवर दिलासा या संस्थेने वेळोवेळी पथनाट्य किंवा साहित्यिक उपक्रमांमधून पाणीबचतीसाठी समाज प्रबोधन केले आहे. आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्याने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता पाणीबचतीचे आवाहन करावे या हेतूने सुरेश कंक यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका मांडली.

कंक म्हणाले, “पाणी हे जीवन आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. शहरातील नागरिकांनी दोन दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल तक्रार करू नये. दररोज पाणीपुरवठा करावा, अशा मागण्या महापालिकांना करणे चुकीचे आहे.

पावसाळा कधी सुरू होईल, हे सांगता येणार नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. शुद्ध पाण्याची बाटली ( बिसलरी) वीस रुपयांना मिळते. पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका रोज शहराला बिसलरीसारखे शुद्ध पाणी नाममात्र दरात कायम पुरवत आहेत. यासाठी या महापालिकांचे आभार शहरातील कोणत्याच नागरिकांनी किंवा संस्थांनी कधीच मानले नाहीत. वाढत्या शहरीकरणामुळे यापुढे पाण्याची समस्या गंभीर होणार आहे.

चाकण, वाघोली या नव्याने विकसित झालेल्या भागात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. मराठवाड्याच्या कित्येक भागात चार ते पाच दिवसांनी पाणी मिळते. कित्येक गावी महिला डोक्यावर हांडे घेऊन मानेचा काटा दुखेपर्यंत दोन-दोन मैलांवरून पाणी आणतात.

सुदैवाने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर यांना नैसर्गिक पाणी स्त्रोत लाभले आहेत. म्हणून पाण्याची उधळपट्टी नको. पाणी जपून वापरणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.