Pimpri News : श्रीमंत नगरपालिका, महापालिकेचा कारभार तब्बल 17 वर्ष भाड्याचा इमारतीमधून चालत होता !

आता 7 एकरमध्ये होतेय 13 मजली प्रशासकीय इमारत

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमधील 7 एकर जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 13 मजली नवीन भव्यदिव्य अशी प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. पण, 1970 ला नगरपालिका स्थापन झाल्यापासून 1987 पर्यंत जवळपास 17 वर्ष आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत असा लौकिक असलेल्या नगरपालिका, महापालिकेचा कारभार हा भाड्याच्या इमारतीमधून होत होता. यावर नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही. पण, ही वस्तुस्थिती आणि सत्य आहे.

नगरपालिका ते महापालिका आणि आता महानगर या प्रवासात पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने विकास झाला असून गेल्या काही वर्षांत शहराचा कायापालट झाला आहे. शहर विकासाचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने 4 मार्च 1970 ला नगरपालिका स्थापन झाली होती. नगरपालिकेचे 11 ऑक्टोबर 1982 रोजी महापालिकेत रुपांतर झाले. त्यानंतर महापालिकेची स्थापन झाली तरी प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेची स्वत:ची इमारत नव्हती. भाड्याच्या इमारतीमधून कामकाज चालत होते.

त्यानंतर 1987 मध्ये पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत महापालिकेची प्रशासकीय इमारत बांधण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने विस्तारीकरण करण्यात आले. परंतु, आता जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे 7 एकर जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 13 मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

इतिहास संशोधक, पिंपरी-चिंचवड गाव ते महानगर या पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले की, ”भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी या चार ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून 4 मार्च 1970 रोजी नगरपालिकेची स्थापना झाली. कामकाज करण्यासाठी कार्यालय नव्हते. त्यासाठी पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागील पीडीसी बँकेच्या बाजूची इमारत भाड्याने घेतली होती. आशिया खंडातील नगपालिका भाड्याच्या इमारतीत होती. अब्दुल समजानी यांची ती इमारत होती.

सुरुवातीला फक्त वरचा मजला तात्पुरता भाड्याने घेतला होता. तिथे नगरपालिकेचे कामकाज सुरु होते. त्यानंतर तळमजलाही भाड्याने घेतला. नगराध्यक्ष, जकात विभागाचे काम त्या मजल्यावर सुरु झाले. ते कमी पडू लागल्यानंतर पुन्हा वरचा विभाग घेतला. त्यानंतरही जागेची कमतरता भासू लागली”.

समजानी यांनी त्यांच्या शेजारीच नवीन इमारत बांधली. 26 जानेवारी 1975 ला नगरपालिकेने तीही इमारत भाड्याने घेतली. शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांनी नवीन इमारत बांधण्याचे ठरविले. आत्ताची इमारत असेल्या साडेतीन एकर जागेमध्ये मुंबईतील प्रसिद्ध वास्तु रचनाकर जे. जी. बोधे यांनी इमारतीचा आराखडा तयार केला. प्रस्तावित 11 मजली इमारत होणार होती. डाव्या आणि उजव्या बाजूला सहा-सहा मजले आणि मधल्या बाजूला 11 मजले प्रस्तावित होते. परंतु, ते झाले नाही.

20 मे 1978 रोजी नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून डॉ. श्री. श्री. घारे निवडून आले. त्यांच्याकाळत पुणे – मुंबई महामार्गावरील पिंपरी येथील इमारतीचा आराखडा तयार केला. तत्कालीन नगरविकासमंत्री हशू आडवाणी यांच्या हस्ते 7 जुलै 1979 रोजी कामाचे भूमीपूजन झाले. बांधकाम पूर्ण व्हायला वेळ लागला. जवळपास 8 वर्षांनी म्हणजेच 1987 साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.

या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. इमारतीचे बांधकाम मुंबईतील ग्यानंद अॅण्ड डनकर्ली या बिल्डरने केले. या बांधकामाचा आराखडा किर्लोस्कर कन्सलंटन्शी यांनी बनविला होता. 1 लाख 25 हजार चौरस फुट बांधकाम क्षेत्र होते. सुमारे 17 वर्ष श्रीमंत नगरपालिकेचा कारभार भाड्याच्या इमारतीत आणि अपु-या जागेत होत होता.

उद्योग धंद्यामुळे शहर विकसित झाले. नगरपालिका स्थापन झाली. त्यावेळी लोकसंख्येच्या मानाने जकातीचे दरडोई अधिक उत्पन्न होते. त्यामुळे श्रीमंत नगरपालिका म्हणून नगरपालिका गणली गेली होती. जवळपास 17 वर्ष श्रीमंत नगरपालिका, पालिकेचा कारभार भाड्याच्या इमारतीमधून चालत होता, असे चौगुले यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.