Pimpri News: वृक्षतोड करून पालिका झाडाच्या बुंध्यातून ऑक्सिजन निर्मिती करणार काय?, पर्यावरण प्रेमींचा सवाल

बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोड करून पालिका झाडाच्या बुंध्यातून ऑक्सिजन निर्मिती करणार काय, असा सवाल पर्यावरण प्रेमींनी केला आहे. तसेच बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका उपायुक्त सुभाष इंगळे यांना निवेदन देण्यात आले आहे. देवराई फौंडेशन आणि सावरकर मंडळाचे धनंजय शेंडबाळे, सिटीझन एरिया सभाचे रवी सिन्हा, अंघोळीची गोळी आणि रोटरी क्लब वाल्हेकरवाडीचे सचिन काळभोर, गणेश बोरा, खिळेमुक्त झाडेचे राहुल धनवे, प्रशांत राऊळ, निसर्गराजाचे राहुल घोलप, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे तुषार शिंदे उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून प्राधिकरण, मोशी अशा भागात बेकायदेशीरपणे वृक्षांची तोड केली जात आहे. साईन बोर्ड, होर्डिंगच्या समोर बेकायदेशीर झाडांच्या फांद्या तोडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा. झाडांवर लावलेले खिळे, जाहिराती तत्काळ काढून टाकण्यात याव्यात.

झाडांवर जाहिराती लावणा-यांवर कारवाई करावी. एनजिटीच्या आदेशानुसार झाडाच्या एक मीटर परिघातील काँक्रीटचे थर, ब्लॉक काढावेत. सार्वजनिक नोटीस बजावून, सोशल मीडियाचा वापर करून बेकायदेशीर झाडे तोडण्याच्या विषयावर जनजागृती करावी. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सर्व व्यावसायिक आस्थापने, संस्था आणि एजन्सीला माहितीपूर्ण नोटीस पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

पर्यावरण प्रेमी गणेश बोरा म्हणाले, ”शहरात बेकायदेशीर झाडे तोडली जात आहेत. त्याकडे पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. झाडांपासून नागरिकांना धोका असेल. फांद्या रस्त्यावर येत असतील. तर ते तोडण्यासाठी नियमानुसार कारवाई करावी. छाटणी करण्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे पूर्ण झाडच कट केले जात आहे. शहराचे ग्रीन कव्हर नष्ट करण्याचे काम करू नये. पालिका अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. झाडे लावली जात आहेत. पण, दुसरीकडे झाडे तोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. हे थांबले पाहिजे”.

याबाबत बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईचा अहवाल मागविण्यात आला आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.