Pimpri News: ‘महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यादृष्टीने कामाला लागा. बुथ पातळीवर काम करा, काँग्रेसचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, अशा सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

तसेच संघटना बांधणीसाठी मी स्वत: शहरात येणार आहे. पक्षाचे मंत्री शहरात येवून जनता दरबार घेतील. त्यांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्न सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिका-यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. शहरातील काँग्रेसच्या परिस्थितीचा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आढावा घेतला.

सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, कैलास कदम, श्यामला सोनवणे, गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे मयुर जयस्वाल, विष्णू नेवाळे, बाळासाहेब साळुंखे, हिरामण खवळे, मकरध्वज यादव, बाबा बनसोडे, सज्जी वर्की, चंद्रशेखर जाधव, कुंदन सस्ते, विशाल सस्ते आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

सचिन साठे यांनी 11 नोव्हेंबर 2020 रोजी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, पक्षाने तो अद्याप मंजूर केला नाही.

राष्ट्रवादीने वापर केल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप

_MPC_DIR_MPU_II

पक्ष नेतृत्वाने शहराकडे पूर्ण लक्ष घालावे. पटोले यांनी स्वत: पालकत्व घ्यावे. आजपर्यंत राष्ट्रवादीने वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विधानपरिषदेचे आश्वासन दिले पण, त्याचे पालन केले नाही. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर कोणत्याही प्रदेश स्तरावरील नेत्यांनी शहर काँग्रेसकडे लक्ष दिले नाही. कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. त्यामुळेच महापालिकेत एकही नगरसेवक निवडून येवू शकला नाही.

महापालिकेत एकही नगरसेवक नसला तरी, आम्ही काम थांबविले नाही. आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहोत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच स्वबळावर लढू. शून्यातून उभे राहण्यास आम्ही तयार आहोत पण, आम्हाला ताकद द्यावी. शहरातील स्थानिक नेतृत्वाला न्याय देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली. निवडणूक जवळ आली असल्याने सचिन साठे यांनाच शहराध्यक्षपदी कायम ठेवण्याचीही मागणी कार्यकर्त्यांनी केली.

कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढायची आहे. त्यादृष्टीने पक्षसंघटना वाढीसाठी कामाला लागाला. संघटना बांधणीसाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे. शहराच्या दौ-यावर येणार आहे.

मी कोणाला घाबरत नाही. भंडा-यात माझा संघर्ष राष्ट्रवादीशी आहे. त्यामुळे तुम्हीही कोणाला न घाबरता कामाला लागा. बुथ पातळीवर काम करावे. पक्षाचे मंत्री शहरात येवून जनता दरबार घेतील. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविले जातील. काँग्रेसचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागा.

सध्या सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली काम चालू ठेवा. अध्यक्ष निवडणुकीच्या बाबतीत लवकरच निर्णय घेवू, असेही पटोले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.