Pimpri: भाजप-शिवसेनेची महापालिकेत युती नाहीच; शिवसेनेला पुन्हा ‘ठेंगा’ 

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर शिवसेनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेत सहभागी करुन घेण्याच्या केलेल्या मागणीकडे भाजपने दुर्लक्ष केले आहे. भाजपने महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता विषय समिती सभापती निवडणुकीत देखील शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेतले नाही. महापालिकेत भाजप-शिवसेनेची युती झालीच नाही. त्यामुळे शिवसेनेला महापालिकेत विरोधकांची भूमिका बजावावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली. ही युती विधानसभा निवडणुकीसाठी देखील कायम राहणार आहे. युती होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेत सहभागी करुन घेण्याची मागणी शिवसेनेने केली होती. याबाबत पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांना पत्र दिले होते. त्यामुळे महापालिकेतील प्रभाग समितीच्या निवडणुकीत सत्ताधा-यांकडून शिवसेनेला सहभागी करुन घेतले जाईल असे अपेक्षित होते. भाजपने शिवसेनेला एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले नाही.

त्यानंतर विषय समितींच्या सभापती निवडणुकीत एखाद्या समितीचे सभापतीपद मिळावे, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. परंतु, भाजपने शिवसेनेला पुन्हा ‘ठेंगा’ दिला. विषय समिती सभापतीपदी निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 10)उमेदवारी अर्ज भरण्यात आले. केवळ भाजपच्या नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून त्यावर येत्या शुक्रवारी (दि.14)अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. शिवसेनेने सत्तेत सहभागी करुन घेण्याची मागणी भाजपने धुडकाविली. तरी, देखील मुख्य विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल न करता निवडी बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.

महापालिकेत भाजप-शिवसेनेची युती झालीच नाही. त्यामुळे शिवसेनेला महापालिकेत विरोधकांची भूमिका बजावावी लागणार आहे. दरम्यान, वरिष्ठांकडून आदेश आला नसल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.