Pimpri : ऑप्टीमाईज पध्दतीने वाहतूक नियंत्रण करणारी प्रणाली विकसित

राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या करण वाघेरे याचे संशोधन

एमपीसी न्यूज – शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नलचे एकत्रिकरण करुन उच्च संगणक प्रणालीव्दारे नियंत्रण केल्यास शहरातील वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखता येईल. तसेच प्रवाशांच्या वेळेची व इंधन बचतीतून पैशांची बचत होईल अशी संगणक प्रणाली ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या करण वाघेरे यांनी विकसित केली आहे. त्याचे त्यांनी ‘पेटंट’नोंदणी केली आहे.

ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळीच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये संगणक शाखेत चौथ्या वर्षात शिक्षण घेणा-या करण शंकर वाघेरे यांनी प्राचार्य डाॅ.आर. के. जैन आणि प्रा. संतोष जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रस्तावित संगणक प्रणालीमध्ये एकाच सर्व्हरसह अनेक इन्फ्रारेड सेंन्सरचा समावेश करुन ऑप्टीमाईज पध्दतीने वाहतूक नियंत्रण करता येईल.

अनेक मार्गावर वाहने नसतानाही सिग्नल सुरुच असतो त्यामुळे विरुध्द किंवा डाव्या व उजव्या बाजूने येणा-या वाहनांना थांबावे लागते. यामुळे त्या तीनही दिशांवरील वाहनांची इंजिन सुरुच असतात. यातून इंधनाचा व वेळेचा अपव्यय होऊन प्रदूषणात भर पडते. या संगणक प्रणालीव्दारे ज्या दिशेने येणा-या वाहनांची संख्या जास्त असते त्या दिशेचा सिग्नल हिरवा करुन त्यांना प्रथम जायला संधी दिली जाते.

सिग्नलला थांबलेल्या वाहनांची सर्व्हरमध्ये सेंन्सरव्दारे नोंद होऊन अधिक संख्येने असणा-या वाहनांना प्रथम संधी दिली जाते. ज्या बाजूने वाहने नसतात तो सिग्नल लाल करुन वाहतूक नियंत्रण करता येते. सर्व्हरकडे जमा झालेल्या वाहनांच्या संख्येचे विश्लेषण व सिग्नलचे सर्व नियंत्रण सर्व्हरव्दारे केले जाईल. वाहनांची संख्या विचारात घेऊन सिग्नलची वेळ आवश्यक तेथे कमी जास्त करता येईल.

यामध्ये आवश्यक असेल तरच रुग्णवाहिका, अग्निशामक बंब, अतिमहत्वाच्या व्यक्ती, वेळ प्रसंगी अत्यावश्यक सेवेसाठी मानवी हस्तक्षेप करता येईल. या प्रणालीतून जमा होणारा डेटा सुरक्षितपणे एनक्रिप्ट करता येईल. यासाठी आयआर सेंन्सरचा वापर करण्यात आल्यामुळे एका शहरातील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कमीत कमी खर्च येईल. अशी संगणक प्रणाली प्रायोगिक तत्वावर पुणे व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांअंतर्गत करावा यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे प्राचार्य डाॅ.आर.के. जैन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.