Pimpri : पखवाज वादक अनुजा बोरुडे

एमपीसी न्यूज- सामान्यपणे पखवाज किंवा मृदंग ही वाद्ये पुरुष वाजवताना आपण पाहतो. पण या वाद्यावर अखंड परिश्रमातून हुकूमत मिळवलेली आपल्या पिंपरी चिंचवड नगरीची कलाकार अनुजा बोरुडे हिने पखवाज वादनामध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा निर्माण केला आहे.

ज्यावेळी मुली हातात पेन्सिल पकडून चित्र काढण्याचा प्रयत्न करतात त्या वयात अनुजाने पखवाज हातात घेतला. अनुजाचे वडील ज्ञानदेव बोरुडे हे हार्मोनियम वादक. त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जात असताना अनुजाला पखवाज या वाद्याबद्दल आकर्षण निर्माण झाले. तिने पखवाज शिकून त्यावर प्रभुत्व मिळविण्याचा निश्चय केला. वडिलांनी देखील तिला प्रोत्साहन दिले. अशोक महाराज पांचाळ यांच्या हाताखाली भजन बाज शिकत असताना पहाता पहाता पखवाजसारखे पुरूषी वाद्य तिने लिलया हाताखाली घेतले. घरातल्याना आणि शेजाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी ती वडिलांबरोबर पहाटे उठून निगडी प्राधिकरणातील मुकबधीर शाळेत जाउन रियाज करीत असे.

पुढे वयाच्या 11 व्या वर्षी प्रख्यात पखवाजवादक पंडित वसंतराव घोरपडकर यांचे तिने शिष्यत्व पत्करले. त्यांच्याकडे अखंडपणे रियाज करताना तिने पखवाज वादनामधील खाचाखोचा समजून घेतल्या. पुढे वसंतरावजींच्या निधनानंतर 14 व्या वर्षी धृपद घराण्यातील पखवाज वादक पद्मश्री पंडित अखिलेश गुदेंचा (भोपाळ ) यांचे शिष्यत्व स्विकारले. भोपाळ येथेच गुरूकुलात ती सध्या शास्त्रीय पखवाज वादन शिकत आहे.

आतापर्यंत तिने भारतात व भारताबाहेर अनेक सोलो परफॉर्मन्स सादर केले आहेत. विविध कार्यक्रमात पं. गुंदेचा बंधु, विदुषी ज्योती हेगडे, शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, ज्ञान निलेश यांना पखवाजवर साथसंगत केली आहे. तसेच कालिदास समारौह उज्जैन, तानसेन समारोह, धुप्रद उत्सव, महिला पखवाज पर्व आदी विशेष कार्यक्रमात तिने आपली कला सादर करुन रसिकांच्या मनांत घर केले आहे. भारताबाहेर युरोप, बेल्जियम, लंडन याठिकाणी तिने आपली कला सादर केली आहे.

अनुजा बोरुडे म्हणाली, ” घरात या पखवाजची कोणतीही परंपरा नाही. वडिल हार्मोनियम वाजवतात. त्यांच्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला गेली असताना या वाद्याची आवड निर्माण झाली. वडिलांनी देखील मला प्रोत्साहन दिले. भारतीय संगीत शिकण्यासाठी जगभरातून लोक भारतात येतात. सध्या पाश्‍चात्त्य संगीताएवढा शास्त्रीय संगीताला देखील वाव आहे. ध्रुपदसारख्या अवघड गायकीकडे तरुणांचा ओढा वाढतो आहे. प्रत्येक क्षेत्रात सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. पखवाज वादनाचे क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. या क्षेत्रात देखील तरुणी पखवाज वादन शिकू लागल्या आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.