Maval : पवार यांच्या नातवाची स्टंटबाजी ठरलीय चेष्टेचा विषय

पार्थ यांची मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी धावाधाव

एमपीसी न्यूज- मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी उमेदवार काय करतील याचा काही नेम नाही. अशाच प्रकारच्या नसत्या खटाटोपांमुळे मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची स्टंटबाजी चर्चेत आली आहे. मतदार संघातील प्रश्नांना बगल देत बैलगाडी, लोकल, रिक्षा मधून प्रवास करत मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र एवढेच भांडवल पाठिशी असलेल्या पार्थ यांची धावाधाव चेष्टेचा विषय ठरली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पार्थ पवार यांचा सामना शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी आहे. कधीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपाठीवर न दिसलेले अथवा संघटनात्मक पातळीवर काम न केलेले पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह मतदारांच्याही भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीच्या इच्छुकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. नाराजीचा घोट गिळून पार्थ यांच्यासोबत माघार घेतलेल्या इच्छुकांचीही त्यांच्या मागे धावाधाव सुरू आहे. केवळ राजकीय वारसा एवढी एकमेव शिदोरी असलेल्या पार्थ यांची पहिल्याच भाषणात भंबेरी उडाली. लिहून दिलेले भाषणही त्यांना शुद्ध मराठीत वाचता आले नाही. यावेळी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी नेत्यांच्या माना शरमेने खाली झुकल्या. विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले.

पहिलेच भाषण तोंडघशी पाडणारे ठरल्याने पार्थ यांनी आता प्रवासी साधनांमधून प्रचाराचा फंडा आजमावला आहे. रिक्षा, लोकल, बैलगाडी यातून प्रवास करत मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कोंडाळे असते. अशामध्ये मतदार दूर आणि पदाधिकाऱ्यांचीच ‘टूरटूर’ निघते. पार्थ यांच्या सोशल मीडिया टीमकडून पद्धतशीरपणे त्यांच्या प्रवासाचे व्हिडीओ ‘व्हायरल’ केले जात आहेत. पार्थ पवार यांचा धावतानाचा व्हिडीओ पनवेलमध्ये वाऱ्यासारखा पसरला आहे. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पळत सभेसाठी जात असल्याचा व्हिडीओ पसरविण्यात आला आहे. मात्र, येथे पार्थ यांची कोणतीही सभा नव्हती एवढेच नव्हे तर वाहतूक कोंडी देखील झाली नव्हती. केवळ प्रसिद्धीसाठी केलेला हा ‘स्टंट’ होता हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पार्थ सोशल मीडियावर ‘ट्रोल’ झाले आहेत. पार्थ पवार यांचे आणखी कोणकोणते ‘स्टंट’ पहायला मिळणार याबाबतची खुमासदार चर्चा मावळ मतदार संघात रंगली आहे.

काँग्रेसची नाराजी…
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली असली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये बिघाडीचे वातावरण आहे. अख्खे पवार कुटुंब पार्थ यांच्यासाठी मावळात प्रचारासाठी उतरले आहे. मात्र, काँग्रेसला वगळून प्रचार यंत्रणा राबविली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पार्थ यांच्या प्रचारापासून चार हात लांब आहेत. ही बाब विरोधी उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पथ्यावर पडणारी ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.