महेश काळे यांच्या बहारदार गायनाने स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या बहारदार गायनाने पिंपरी चिंचवडकर रसिक श्रोत्यांना अस्सल शास्त्रीय मैफलीचा अनुभव घेता आला. निमित्त होते पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टच्या वतीने निगडी प्राधिकरण येथील भेळ चौकाजवळ असलेल्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे.

आज महेश काळे यांच्या बहारदार आणि घरंदाज गायकीने महोत्सवाचा समारोप झाला. त्यांनी राग मारूबिहाग रागातील ‘गाऊं गुणन कैसो तुमरो…’ या बंदिशीने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पं. वसंतराव देशपांडे यांची ‘ मै पतियां हां लिख भेजी…’ व पं जितेंद्र अभिषेकींची ‘बाली उमरीयां मेरी…’ ही रचना सादर केली. ‘माझे जीवन गाणे… ‘ या त्यांनी सादर केलेल्या नाट्यगीताने उपस्थितांची वाह वाह मिळविली. तर सुधीर मोघे लिखित सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले पुरया धनश्री रागातील ‘गुरु एक जगी त्राता…’ हे भावगीत व ‘मुरलीधर श्याम हे नंदलाला… ‘ हे पं. जितेंद्र अभिषेकींनी संगीतबद्ध केलेले पूर्वा कल्याण रागातील नाट्यगीत याने उपस्थितांना एक वेगळीच अनुभूती दिली.

महेश काळे यांना यावेळी निखील फाटक (तबला), राजीव तांबे (संवादिनी), उद्धव कुंभार  (तालवाद्य), प्रसाद जोशी (पखावज व जेंबे), अनय गाडगीळ (की बोर्ड), अभिजित भदे (ड्रम्स), रितेश ओव्हळ (गिटार), श्रुती भावे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, शरयू फाउंडेशनचे नितीन ढमाले, अभिजित भालेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.